सातारा : संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघाची एक फेरी पूर्ण करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी येथील प्रीती एक्झिक्युटीव्ह हॉटेलमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांची भेट घेतली. यावेळी कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे व वसंतराव मानकुंमरे हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी रामराजे व उदयनराजे याची कमराबंद चर्चा झाल्याची माहिती आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सातारा जिल्ह्यातील दीड हजार ग्रामपंचायतींना भेटी देणे, जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते संघटना विविध संघटनांचे पदाधिकारी यांचा गाठीभेटीचा सिलसिला कायम ठेवला आहे. उदयनराजे यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट जाहीर केल्यानंतर राजेंच्या प्रचाराला प्रचंड वेग आला आहे.
पाटण, कराड दक्षिण व उत्तर या तीन मतदारसंघांच्या प्रचारावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. शनिवारी सातारा व कोरेगाव विधानसभा मतदारसंघात व्यस्त असणाऱ्या उदयनराजे यांनी दुपारी येथील प्रीती एक्झिक्युटीव्ह हॉटेलमध्ये रामराजे नाईक निंबाळकर व प्रभाकर घार्गे यांची भेट घेतली. रामराजे नाईक निंबाळकर हे अजितदादा गटाच्या निमित्ताने महायुतीत सामील असले तरी माढा मतदारसंघातील रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला त्यांचा आक्षेप आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव कायम ठेवून आहेत.
उदयनराजे व रामराजे यांचे राजकीय संबंध नेहमीच कडू गोड राहिले असले तरी पिढी जात स्नेहाचा सलोखा असे नेहमीच रामराजे सांगतात याचा राजकीय अर्थ काढू नये असेही ते म्हणतात मात्र लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता सुरू असताना रामराजे यांची उदयनराजे यांनी घेतलेली भेट ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्यामध्ये विविध विषयांच्या अनुषंगाने कमरा बंद चर्चा झाल्याची माहिती आहे.
दोन्ही राजे एकत्र आले की नेहमीच चर्चा होते त्या भेटीचे राजकीय संदर्भ लावले जातात. मात्र दुसरीकडे रामराजे व आमदार शशिकांत शिंदे यांच्यातील राजकीय संबंध फारसे मधुर नव्हते. सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणात याचा पुरेपूर अनुभव आलेला आहे. थोरल्या पवारांचा निष्ठावंत म्हणून जिल्हा बँकेच्या राजकारणात शशिकांत शिंदेंना रोखण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले हे सर्व संदर्भ लक्षात घेतले तर आजच्या गाठीभेटींना राजकीय महत्त्व आहे.
माथाडी नेते व माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे व उदयनराजे यांची झालेली भेट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा गटही सक्रिय आहे. त्यामुळे या गाठीभेटींच्या निमित्ताने उदयनराजे यांनी बेरजेचे राजकारण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.