
अहिल्यानगर : दिवाळी म्हणजे रोषणाई आणि दिव्यांचा सण. मात्र हाच सण साजरा करताना आपण त्यांचीही आठवण ठेवली पाहिजे जे सीमेवर लढत आहेत आणि म्हणून आपण आज सुरक्षित जगत आहोत. याच भारतमातेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना दिवाळीच्या निमित्ताने आदरांजली अर्पण करण्यात आली. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नेवासे शहरातील स्वातंत्र्यकालीन ऐतिहासिक मोहिते चौकातील झेंडावंदन पटांगणावर आझाद हिंद मित्र मंडळातर्फे ‘एक पणती जवानांसाठी’ कार्यक्रमांतर्गत आजी-माजी सैनिक व पोलीसांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे हे नववे वर्ष आहे. यावेळी उपस्थित नेवासेकर नागरिकांच्या टाळ्याचा कडकडाट व “भारत माता की.. जय…” या घोषणांनी ऐतिहासिक मोहिते चौक व परिसर दणाणून गेला होता.
राष्ट्रभक्तीने भारावून टाकणाऱ्या ‘एक पणती जवानांसाठी’ कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात येऊन शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. नंतर आजी-माजी सैनिक व पोलीस व वीर पत्नींचा आझाद हिंद मित्र मंडळाचे वतीने एक पणती जवानांसाठी कार्यक्रमांतर्गत सन्मान करण्यात आला.
यावेळी रम्हूशेठ पठाण, समर्पणचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले, डॉ. नितीन करवंदे, डॉ. स्वप्निल बल्लाळ, डॉ. सुजित मोटे, डॉ. निलेश लोखंडे, डॉ. संजय सुकाळकर, विजय कावरे, उदयकुमार बल्लाळ, सतीश पिंपळे, प्रा. रमेश शिंदे, सतीश गायके, मकरंद देशपांडे, एड. भैय्या काझी, प्रशांत कानडे, अभय मोहिते, रज्जाक शेख, सलीम देशमुख, संदीप मोहिते, शंकर अंबिलवादे, सुभाष मोहिते, असिफ पठाण, रुपेश उपाध्ये,सज्जू पठाण, सागर शिंदे, किरण अंबिलवादे, असिफ देशमुख, प्रमोद देशपांडे, राजेंद्र देशमुख, नितीन सराफ आदी उपस्थित होते. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर अॅड. अक्षय मोहिते यांनी आभार मानले.
‘एक पणती जवानांसाठी’कार्यक्रमांतर्गत पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव, मेजर आप्पासाहेब सोनवणे,जगदीश ढगे,अरुण फाटके,ज्ञानेश्वर बर्डे, देविदास कराळे,अरुण इखे,संदीप कराळे,बाबासाहेब वैद्य,गोरखनाथ गिऱ्हे,बाबासाहेब आवारे, अशोक राजळे, अण्णासाहेब पटारे,आप्पासाहेब पिंपळे,चंद्रकांत कडू, रघुनाथ मैंदाड, शुभम शिंदे,पंढरीनाथ भोरे, वीरपत्नी सरिता कराळे, कल्पना इखे यांचा सन्मान करण्यात आला.
• तिरंगा उभारला : नेवाशातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांनी मोहिते चौकात ध्वजस्तंभाची स्थापना करून तिरंगा उभारला व १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे येथे आनंदोत्सव साजरा केला होता. तेव्हापासून या ठिकाणी २६ जानेवारी व १५ ऑगस्टला ध्वजारोहण केले जाते.
• स्वातंत्र्योत्तर काळात सभा : स्वातंत्र्योत्तर काळात या ऐतिहासिक झेंडावंदन पटांगणात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मोठ्या नेत्यांच्या सभा होत असत. अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, काकासाहेब गाडगीळ, साने गुरुजी, पत्री सरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील अशा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या सभा येथे झाल्या होत्या.
“आजकालची लढाई देशाच्या सीमेवर नाही तर देशांतर्गतच होत आहे. नागरिकांमध्ये याबाबत जागृती होत नाही, तोपर्यंत लढाई थांबणार नाही. त्यामुळे जवानांचे कार्य व त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी “एक पणती जवानांसाठी“ हा कार्यक्रम घेण्यात येतो. असं अॅड. अक्षय मोहिते, मुख्य आयोजक, नेवासे यांनी सांगितलं आहे. “केवळ देशसेवेला प्राधान्य देणाऱ्या सैनिकांच्या योगदान व कार्याविषयी कृतज्ञता म्हणुन आझाद हिंद मित्र मंडळातर्फे होणारा सन्मान हा ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देणारा व नेवासे शहराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारा आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. करणसिंह घुले, अध्यक्ष, समर्पण फाउंडेशन, नेवासे यांनी दिली आहे.