
Ahilyanagar News: कोपरगाव पॅटर्नची सगळीकडे चर्चा! तहसीलदारांनी थेट बांधावर जाऊनच...
संजय देशपांडे / अहिल्यानगर :कोपरगाव तालुक्यातील शेतशिवार रस्त्यांवरील प्रलंबित प्रकरणांवर तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यायनिवाडा करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. मागील तीन महिन्यांत ६० प्रकरणे निकाली काढून सुमारे ४५ किमी रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे ३५४ कुटुंबांना शेतरस्त्याची सुविधा मिळाली असून २१७५ शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. सावंत यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, तो आता ‘कोपरगाव पॅटर्न’ म्हणून राज्यभर गाजत आहे.
कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र जमिनीचे तुकडे, कौटुंबिक वाटणी आणि खरेदी-विक्री व्यवहारांमुळे शेतरस्त्यांवरून वाद निर्माण होत होते. यामुळे वेळ, श्रम आणि संसाधनांचा अपव्यय तर होताच, पण कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सावंत यांनी ‘बांधावरच न्यायनिवाडा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला.
या उपक्रमांतर्गत गावनकाशानुसार अतिक्रमित किंवा बंद झालेले शिवाररस्ते, गाडीमार्ग व पायमार्ग मोकळे करण्यात आले आहेत. आतापर्यंत करंजी, चांदेकसारे, जेऊर कुंभारी, शहाजापूर, शिरसगाय, संवत्सर, ओगदी, मलेगावबडी, धौडेवाडी, सांगवी भुसार, कोकमठाण, नाटेगाव, देहें बांदवड, कोळपेवाडी, मढी, तिळवणी, गोधेगाव, वारी, वाकडी, धामोरी, तळेगाव मळे, वेळापूर, करसली, कासली आणि मनेगाव आदी ३५ गावांतील शिवार रस्ते खुले करण्यात आले आहेत.
सडे गावातील शेतकरी विजय पाटील, छब्बू बारहाते, सतिष बारहाते आणि तुळशीराम लोहकणे म्हणाले,
“गेल्या ३०-३५ वर्षांपासून सतीच्या बांधाचा रस्ता वादग्रस्त होता. तहसीलदार सावंत दोनदा बांधावर आले, सर्वांशी संवाद साधला आणि सामोपचाराने रस्ता खुला झाला. आता दोन किलोमीटरचा रस्ता सर्वांसाठी खुला झाला असून शंभरहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.”
उपविभागीय अधिकारी माणिक आहेर म्हणाले, “शेतजमिनींच्या विभाजनामुळे रस्त्यांवरील वाद वाढले होते. मात्र तहसीलदार सावंत यांनी ६० प्रकरणे सामोपचाराने निकाली काढली. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचले, तसेच अपील आणि पुनर्विचार प्रकरणांची संख्याही घटली आहे. हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आणि अनुकरणीय आहे.”
Jalgaon News: परतीच्या पावसाचा दणका! कचऱ्यांच्या ढिगांचे वाढले साम्राज्य, आरोग्यालाही धोका
“प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता मिळालाच पाहिजे,” असा संकल्प महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला असून, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे. गावपातळीवरच वाद मिटवल्याने जय-पराजयाची भावना संपली आणि अपीलांचे प्रमाण जवळपास शून्य झाले आहे.