
पोलिसांना मिळणार हक्काचे घर! सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून 53 कोटींचा निधी मंजूर
बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून संगमनेर शहरातील पोलीस विभागासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि अद्ययावत घरे मिळावीत तसेच प्रशस्त कार्यालयीन सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी २५ मे २०२३ रोजी ५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहर आणि समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी २४ तास सांभाळणाऱ्या पोलीस दलाच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसह त्यांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
या निधीतून आधुनिक पोलीस लाईन प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामध्ये सुसज्ज निवासस्थाने, प्रशस्त कार्यालय, गार्डन, पार्किंग, सुशोभीकरण, प्रशिक्षण केंद्र अशा सर्व आवश्यक सुविधा असतील. संगमनेरमध्ये पोलिसांसाठी प्रथमच अशा दर्जाचे ‘ड्रीम होम’ उभारले जाणार असून हा प्रकल्प माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याचे फलित आहे.
Ahilyangar News: जिल्ह्यात माविआचा घोळ अजूनही मिटला नाही, मित्रपक्षच असतील एकमेकांच्या विरोधात?
बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये अनेक पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत. हायटेक बसस्थानक, पंचायत समिती, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह, भव्य क्रीडा संकुल, उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, बायपास मार्ग, हॅपी हायवे, नवीन कोर्ट, प्रवरा नदीवरील पूल, भूमिगत गटारे आणि शहरातील गार्डन अशी अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत.
निळवंडे धरणातून थेट पाईपलाइनद्वारे संगमनेर शहराला २४ तास स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा सुरू आहे. शहराच्या विकासात ऐतिहासिक पायऱ्या ठरणाऱ्या या योजना माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून राबवल्या गेल्या आहेत. नव्या ‘ड्रीम होम’ प्रकल्पामुळे संगमनेरच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.