पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. हा कचरा इथे मला उचलण्यासाठी ठेवला आहे का? इथे तुम्हाला झक मारण्यासाठी ठेवले आहे का? असे ते यावेळी म्हणाले. पुण्यात जीएसटी भवनच्या इमारतीचे उद्घाटन करायला आलेल्या अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढले आहे.
पुण्यातील जीएसटी भवनच्या इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वडगावशेरी मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन देखील अजित पवारांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर अजित पवार तेथील पाहणी करत होते. यावेळी अधिकाऱ्यांनी काही कामे व्यवस्थित केली नाही किंवा ती लवकर आवरण्यासाठी वरवर केली. मात्री ही बाब अजित पवार चांगली वाटली नाही. त्यांनी थेट अधिकाऱ्याला बोलावून चांगलचं सुनावलं.
नेमके काय घडलं?
अजित पवार इमारतीच्या उद्घाटनासाठी गाडीतून खाली उतरले. इमारतीकडे जाताना पहिल्याच पायरीला सिमेंट होते. ते सिमेंट व्यवस्थित साफ केलेले नव्हते. अजित पवारांनी संबधित अधिकाऱ्याला विचारले हे असं का झालय? त्यावर अधिकाऱ्याने ते काढायचं राहिले असे उत्तर दिले. अधिकाऱ्याच्या या उत्तरानंतर अजित पवारांचा पारा चढला म्हणाले, हे मला काढायला ठेवलं का? तुम्हाला माहित आहे ना मी बारीक बघतो..मग हे कशाला झक मारायला ठेवलं का? असा संताप पवारांनी व्यक्त केला. तसेच पुढे गेल्यानंतर इमारतीच्या आतील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या मध्येच होते, हे पाहून अजित पवार पुन्हा एकदा चिडले आणि अशी छा चू गिरी करू नका अशा शब्दात तिथल्या अधिकाऱ्यांना झापले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या परखड आणि तेवढ्याच आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. एखाद्या अधिकाऱ्याने जर कामात कुचराई केली तर ते त्याला लगेच धारेवर धरतात. पुण्यातल्या विविध बैठकांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेतच. गेल्या काही दिवसाखाली अजित पवार यांनी रविवार पेठेतील एका सोन्याच्या दालनाचे उद्घाटन केले. उद्घाटन झाल्यावर शेजारीच असलेल्या माहेश्वरी मंदिरामध्ये अजित पवारांनी दर्शन घेतलं. यावेळी मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ असलेला कचरा आणि अस्वच्छता पाहून अजित पवारांनी मंदिर समितीच्या सदस्यांना सुनावलं होत. त्याचबरोबर मंदिरात बांधलेल्या तारा आणि बाकी गोष्टीवरून देखील अजित पवार बोलले. इतकं सुंदर मंदिर आहे, हे काय लावलंय, बाहेर आल्यावर घाण दिसली. इतकं मोठं मंदिर आहे, इतकी माणसं येतात, मंदिर स्वच्छ ठेवायचं. महानगरपालिका झाडेल तेव्हा झाडेल. मंदिरात येताना अशी घाण दिसते बरोबर नाही हे, असं देखील पवार यावेळी म्हणाले होते.