बदलापूरसारख्या घटनांवर सरकार कठोर
यवतमाळ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदलापूरच्या लैंगिक शोषणाच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमात अशा घटनांतील आरोपींना कायमचा धडा शिकवण्याची वेळ आल्याचे सांगताना उद्विग्न भावना व्यक्त केली. त्याविषयी अतिशय कडक व ठोस भूमिका सरकारने घेतली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवण्याची गरज आहे. त्यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे. त्यांच्या मनात तशा प्रकारचा पुन्हा विचारही येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच मुलींवर हात टाकणाऱ्यांवर कायद्याचा एवढा धाक असायला हवा की ते दुसऱ्यांदा विचारही करणार नाहीत. अशा अपराधी वृत्ती असणाऱ्या व्यक्तीला नपुंसक बनवायला हवे, जेणेकरून गुन्ह्याची पुनरावृत्ती होऊ नये’.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवले आणि कशा प्रकारे काही लोक आज नालायकपणा करत आहेत. आज काय काय घडत आहे, त्याविषयी अतिशय कडक व ठोस भूमिका सरकारने घेतली आहे. विरोधकांना त्यांचा विरोध करण्याची मुभा आहे. मी त्यावर बोलणार नाही. पण याविषयी सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे,
शक्ती कायद्यासाठी प्रयत्न करणार
अजित पवार यांनी गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला फाशी व्हायलाच हवी, अशी कठोर भूमिकाही घेतली. ते म्हणाले, बदलापूर अत्याचार प्रकरणात कोणतीही हयगय होणार नाही. यासंबंधी शक्ती कायदा मंजूर करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. काही विकृत माणसे असतात. काही नराधम असतात. पण राज्य सरकारही सुरक्षेच्या बाबतीत डोळ्यांत तेल घालून उभे आहे. आमच्या बहिणींवर हात घालणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल. चुकीचे वागणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.