
नेतृत्व म्हणजे केवळ निर्णय घेणे नाही, तर संबंधित घटकांशी संवाद साधणे, त्यांची मानसिकता समजून घेणे आणि प्रत्यक्ष अडचणींवर तोडगा काढणे, ही भूमिका अजित पवार यांनी सातत्याने बजावली. त्यामुळेच सहकार क्षेत्रातील कामगार, संचालक मंडळे, शेतकरी आणि सभासद यांच्यात त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘अजित दादा आमचे प्रश्न समजून घेतात’ ही भावना सहकार क्षेत्रात सर्वसाधारणपणे व्यक्त केली जात होती. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला. विशेषतः सहकार क्षेत्राचा कायापालट करण्याचा निर्धार अजित पवार यांनी केला होता. साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण, आर्थिक अडचणीत सापडलेल्या संस्थांना मदतीचा हात, दीर्घकालीन नियोजन यावर त्यांचा भर होता. कोणतीही योजना आखताना त्यांनी तिच्या अंमलबजावणीपर्यंतचा विचार केला. त्यामुळे कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्षात बदल घडताना दिसत होता.
अजित पवार यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याची त्यांची सवय. एखाद्या सहकारी संस्थेला अडचण का येते, ती आर्थिक आहे की व्यवस्थापनाची, की धोरणात्मक निर्णयांचा अभाव आहे, याचा ते सखोल अभ्यास करत. त्यानंतरच निर्णय घेत असल्यामुळे अनेक संस्था अडचणीतून बाहेर पडू शकल्या. सहकार हा केवळ राजकीय विषय नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, ही भूमिका त्यांनी कायम जपली.
अजित पवार यांच्या अपघाती निधनाने सर्वसमावेशक दृष्टी असलेल्या नेतृत्वाला सहकार क्षेत्र मुकल्याची भावना संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात व्यक्त होत आहे. अजित पवार ज्या पद्धतीने सहकारातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालत होते, ती उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. सहकार संस्थांतील प्रश्न वाढत असताना, त्यांना समजून घेणारा आणि तत्काळ निर्णय घेणारा नेता नसल्याची खंत सहकार क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
समान न्याय देणारा नेता
सत्ताधारी असो वा विरोधक, असा कोणताही भेदभाव न करता सर्वांनाच समान न्याय देणारा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख होती. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार क्षेत्रातील प्रश्नांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. एखादी संस्था कोणत्या पक्षाशी संबंधित आहे, हे न पाहता त्या संस्थेची अडचण काय आहे आणि ती कशी सोडवता येईल, यावरच त्यांचा भर असायचा. त्यामुळेच सहकार क्षेत्रातील विविध घटकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली होती.
काका-पुतण्याचे याेगदान
पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात पवार काका-पुतण्याचे (शरद पवार व अजित पवार) योगदान कोणालाही विसरता येणार नाही. शरद पवार यांनी सहकार चळवळीला व्यापक दृष्टी आणि राष्ट्रीय ओळख दिली, तर अजित पवार यांनी त्या चळवळीला गतिमान प्रशासन, आर्थिक बळ आणि ठोस निर्णयक्षमतेची जोड दिली. या दोघांच्या नेतृत्वामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने, सहकारी बँका, सूतगिरण्या आणि इतर संस्था केवळ टिकून राहिल्या नाहीत, तर अनेक ठिकाणी त्यांनी प्रगतीची वाटही पकडली.
सहकाराची वाट दिशादर्शक
सहकार हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, ही भूमिका पवार काका-पुतण्यांनी कायम जपली. शेतकरी, कामगार आणि सामान्य सभासद यांच्या हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखली गेली. त्यामुळेच आज सहकार क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर या नेतृत्वाची उणीव अधिक तीव्रतेने जाणवत आहे. पवार काका-पुतण्यांनी घालून दिलेली सहकाराची वाट ही आजही पश्चिम महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरत आहे.