भविष्यात महायुती टिकवून ठेवण्यासाठी...; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
वरवंड : महायुतीत काम करताना, नव्या यशाने हुरळून जायचे नाही. तसेच अपयशाने खचून न जाता जनाधार बरोबर असणे गरजेचे आहे. तेव्हाच राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जुना वाद पक्षात आणू नये, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते दिनांक १ ऑगस्ट रोजी वरवंड येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या जाहिर पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान नवनिर्वाचित कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, उपमुख्यमंत्री अजित पवार,आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटात नव्याने प्रवेश केलेले दौडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा वरवंड ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, पुणे जिल्हा महिलाध्यक्ष मनिषा हरगुडे, तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, युवाध्यक्ष सागर फडके, बापू मेहेर, पुणे जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राहुल दिवेकर, वरवंड ग्रामपंचायत सरपंच योगिता दिवेकर, माजी सरपंच मीनाताई दिवेकर, तसेच पुणे, अहिल्यानगर परिसरातून आलेले पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना या राजकीय प्रवाहात आणणार
यावेळी अजित पवार म्हणाले, मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि कार्यकर्त्यामध्ये ओढाताण झाली असली, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना या राजकीय प्रवाहात आणण्यासाठी आम्ही विचार केला आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंजी उचलण्याची कामे करू नये. प्रत्येकाला गाव पातळीपासून संधी मिळावी, अशी पक्षाची भूमिका आहे. यासाठी भविष्यात महायुती टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जशी जबाबदारी वाढेल, तसे काम करणे गरजेचे आहे.
नागरिकांची कामे मार्गी लावू
कृषिमंत्री भरणे म्हणाले, कार्यकर्त्यांनी आपल्या पुढे-पुढे करावे, असे अजितदादा पवार यांना कधीच वाटत नाही. तसेच अजितदादा पवार यांनी माझ्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी दिली असून, या पदाचा वापर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी निश्चित करण्यात येईल. रमेश आप्पा थोरात हे माझ्यासाठी गुरूस्थानी आहेत.
रमेश थोरात म्हणाले, ३५ वर्षांपासून अजितदादा पवार आणि मी एकत्र काम करत आहे. मात्र अजितदादांच्या व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील नागरिकांची कामे मार्गी लागावीत. तसेच सर्वसामान्य नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी प्रयत्नशील राहावे. तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दौंड तालुक्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी अपेक्षा यावेळी थोरात यांनी व्यक्त केली.