'विरोधकांना पोटदुखी होत आहे त्यामुळे आमच्या चांगल्या योजनेवर टीका करत आहेत- प्रफुल्ल पटेल
भंडारा : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. आगामी निवडणूकांसाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपने प्रचाराचा नारळ फोडला असून महायुतीच्या नेत्यांची दिल्ली वारी वाढली आहे. जागावाटप, फॉर्मुला आणि बैठका यांचे सत्र वाढले आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या नेत्यांनी राजीनाम्याबाबत वक्तव्य केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या राजीनाम्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
या देशात आरक्षण, हे संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे. त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत उगीचच अपप्रचार एवढा झाला. लोकं बळी पडलेत. पण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि आमच्यासारखे अनेक जे कोणी संसदेत संविधानाची शपथ घेऊन बसलेली आहेत ते असं होऊ देणार नाही. आरक्षणाला जर धक्का लागेल तर नक्कीच मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार, पदाचा आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही, म्हणूनच मी त्याग करेल, असे विधान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.
त्यांनी आजपर्यंत आरक्षण नाही
पुढे त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. प्रफुल्ल पटेल म्हणाले, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कालचा, आजचा नाही फार जुना आहे. वर्षानुवर्षी या समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आलेली आहे. ज्यांच्याकडून मागणी होत आहे त्या समाजाचे खंबीर नेतृत्व अनेक वेळा महाराष्ट्रात राहिलेले आहेत. अनेक पक्षात राहिलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत आरक्षण नाही दिलं. पण आज आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त टीका करायची. कारण ते स्वतः देऊ शकले नाही. आणि आता चुका काढत बसायचं. एकच मुद्दा आता निवडणुकीच्या काळामध्ये विरोध करायचा हा एकच मुद्दा बनला आहे. आमचे सरकार ठाम आहे मराठ्यांना आरक्षण मिळालंचं पाहिजे. त्या दृष्टीने विधानसभेत विधेयक पारित झाला, कायदा पण बनला आहे. आणि दहा टक्के आरक्षण दिले आहे. असे मत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले आहे. आरक्षण मिळाले नाही तर राजीनामा देईल असे प्रफुल्ल पटेल म्हटले असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.