“मराठी येत नसेल तर त्याला…”; सुशील केडियाच्या टिप्पणीवर अजित पवारांचं मोठं विधान
मुंबईत गेली तीन दशकं राहणारे आणि आर्थिक सल्लागार म्हणून परिचित असलेले व्यावसायिक सुशील केडिया यांनी नुकतीच मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त पोस्ट केली. “मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोला,” अशा थेट शब्दांत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान दिलं. या विधानानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, अनेक नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौर्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Kunal Kamra : मोठी बातमी! कुणाल कामरा, सुषमा अंधारे अडचणीत; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर
अजित पवार म्हणाले, “माध्यमांनी कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं, यालाही काही मर्यादा हव्यात. संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून, कोणतीही व्यक्ती देशाच्या कोणत्याही भागात जाऊन राहू शकते, व्यवसाय करू शकते आणि आपली भाषा वापरू शकते. पण त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण राहतो त्या भागाची भाषा समजून घेणे आणि आदर ठेवणेही अपेक्षित आहे.”
पवार पुढे म्हणाले, “मुंबईत अनेक असे नागरिक राहतात, ज्यांना मराठी येत नाही. एखाद्याला ती भाषा बोलता येत नसेल तर तो येत नाही असंच म्हणेल. पण मराठी माणसांना आपल्या भाषेबाबत आत्मीयता वाटणं चुकीचं नाही. मात्र त्यातून कोणावर जबरदस्ती करता येणार नाही.”
ते म्हणाले की, “केंद्र सरकारचे अनेक अधिकारी देशभरात बदलीवर असतात. एखादा अधिकारी जर तमिळनाडूतून मुंबईत आला, तर त्याला ताबडतोब मराठी कशी येईल? आपण भारतीय आहोत, ही भावना जपली पाहिजे. मराठी शिकावी, अशी अपेक्षा बाळगणं चुकीचं नाही; पण त्यासाठी दडपशाही करणं योग्य नाही.”
यानंतर अजित पवारांनी मराठी भाषेच्या सन्मानाचा मुद्दाही उपस्थित केला. “आपण अनेक वर्षं प्रयत्न करत होतो की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्याकडे लक्ष दिलं आणि मागील वर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. ही गोष्ट सर्व मराठीभाषिकांसाठी अभिमानास्पद आहे,” असं ते म्हणाले. या संपूर्ण वादावर अजित पवारांनी संयमी भूमिका मांडल्याचं दिसत आहे.