Big Breaking: नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा; 'या' आमदाराचे थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
मुंबई: भाजपचे कोकणातील आमदार नितेश राणे हे सातत्याने धार्मिक वाद वाढेल अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. वारंवार धार्मिक द्वेष वाढवणारी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नितेश राणेंच्या वक्तव्यांची तक्रार दिल्लीत करणार असल्याचे देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर आज आमदार सतीश चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना याबाबत पत्र लिहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून राणेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ”महाराष्ट्रामध्ये येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर केवळ स्वतःचे राजकारण करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. यामुळे मुस्लिम समाजात संतापाची भावना आहे. तसेच याबाबत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र असे असताना देखील ते पुन्हा तशाच पध्दतीची वक्तव्ये करीत आहेत. यामुळे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल अशी सामाजिक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे यासंदर्भात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती”, अशी मागणी सतीश चव्हाण यांनी केली आहे.
अजित पवार यांनी महायुतीमधील शिंदे गट व भाजपमधील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी देखील त्यांनी वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. आता देखील बुलढाण्यामधील सभेमध्ये सत्ताधारी व विरोधी कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त विधानं करु नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे म्हणत अजित पवार यांनी वाचाळवीर नेत्यांना सुनावले आहे. आता याबाबत ते दिल्लीला भाजप श्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत. याबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील भाष्य केले आहे.
आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली…#Sach #SatishChavan #Gangapur #Khultabad pic.twitter.com/eiXu9lCAn8 — Satish Chavan (@satishchavan55) September 20, 2024
भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, ”हिंदू समाजाने एकत्रित आले पाहिजे. एकजूटपणा दाखवला पाहिजे. हिंदू समाज एकत्रित आल्यावर काय करू शकतो हे आपण दाखवून दिले पाहिजे. आम्ही सरकारमध्येच बसलोय. हे हिंदूंचे सरकार आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. इथे भगवाच फडकणार. अजित पवारांना कुठे तक्रार करायची ती करुद्यात. मी माझ्या हिंदुत्वाशी अजितबत तडजोड करणार नाही. ”नितेश राणे यांनी सांगली येथील बत्तीस शिराळा येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाला संबोधित केले.