अंग पुसायचा टॉवेल तरी...; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्टउत्तेपणा आणि त्यांच्या मिश्किल टिपण्या हे सर्वांनाच परिचित आहेत. त्यामुळे अनेकदा उद्घाटनाला गेलेले अजित पवार त्या ठिकाणच्या व्यवस्थेवर स्पष्टपणे टिप्पणी करताना पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका कार्यकर्त्याने आपल्या नव्या गाडीचं उद्घाटन करण्याचा आग्रह धरल्यानंतर त्याला दादांनी ट्राफिक नियमाचे चार धडे दिले होते. त्यानंतर आता पुण्यातील एका रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान अजित पवारांनी आई-वडिलांच्या सत्कारासाठी वापरण्यात आलेल्या शालीवरून डॉक्टरांची चांगली शाळा घेतली.
पुण्यातील दूधभाते नेत्रालय क्लिनिकच्या उद्घाटनासाठी अजित पवार हे पोहोचले होते. या क्लिनिकच्या उद्घाटनानंतर बोलताना अजित पवार म्हणाले, मी बारकाईने हे रुग्णालय चेक केल आहे. खूप सुसज्ज असं नेत्रालय आहे. मी पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. जग पुढ गेलं आहे. सगळ्या क्षेत्रात AI चा वापर होत आहे. जीवनात डोळ्याचं स्थान अन्यासधरण आहे. डोळ्यामुळे आपण जग पाहतो. आपल्या लोकांना पाहतो. पण आजकालच्या जगात डोळ्यांना अनेक आजाराने ग्रासल आहे. मलाही रेटिना हा आजार झाला होता, असं अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार पुढे म्हणाले, डोळ्याच्या दवाखान्याचे उद्घाटन होत आहे आणि ही पत्रिका गमतीशीर काढली आहे. पत्रिकेत अक्षर अतिशय बारीक लिहिले आहेत. ज्यांना हे अक्षर वाचता आले नाही त्यांना या डॉक्टरची गरज आहे, असं म्हणत अजित पवार यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली, यानंतर एकच हशा पिकला.
अजित पवार म्हणाले, डॉक्टरांनी मला घाई गडबड असली तरी माझ्या आई वडिलांचा सत्कार करा, अशी विनंती केली. मला वाटलं डॉक्टर आता आई-वडिलांचा सत्कार करताना छान अशी शाल वगैरे काहीतरी देतील. मात्र डॉक्टरांनी वडिलांना शाल टाकताना खूप काटकसर केली. छोटा टॉवेल दिला. रुग्णालयाला एवढा खर्च केला आणि वडिलांना शाल देताना मात्र काटकसर केली.आई-वडिलांचा सत्कार करताना जे दिल त्यापेक्षा अंग पुसायचा टॉवेल तरी मोठा असतो, डॉक्टर हे वागणं बरं नव्हं अजित पवार म्हणाले. सगळे म्हणतात या बाबाला कार्यक्रमाला बोलवायचं म्हणजे हा बाबा काहीही बोलून जाईल पण मी खरं बोलतो वडिलांच्या मुळेच आपल्याला अस्तित्व आहे, असे सांगत अजित पवार यांनी मिश्किलपणे डॉक्टरांची शाळा घेतली. लोकांमध्ये एकच हाशा पिकला.