अजित दादांच्या निधनानंतर आमदार सत्यजित तांबे झाले व्यक्त
वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि कायम प्रोत्साहन देणारे अजितदादा माझ्यासाठी फक्त नेते नव्हते, तर आधार होते. २०१२ मधील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त सदस्य असल्यामुळे माझे नाव निश्चित झाले मात्र अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले. रागाच्या भरात दादांना फोन केला तेव्हा तू शांत हो, मुंबईला ये, आपण भेटू असे त्यांनी शांतपणे सांगितले. भेटल्यानंतर त्यांना संधी हिरावून घेतल्याचे सांगितल्यावर ते म्हणाले होते, की राजकारण राजकारणाच्या पद्धतीनेच करावं लागतं. आम्ही राज्यपातळीवर एक धोरण ठरवलं, त्यात तुझं नुकसान झालं, यासाठी मी तुला सॉरी म्हणतो. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माणसाला ‘सॉरी’ म्हणण्याचा तो त्यांचा मोठेपणा विलक्षण होता.
दादांचा स्वभाव कडक होता, त्यांच्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा होता, पण मनातून ते अतिशय हळवे होते. त्यामुळे त्यांच्या रोखठोक स्वभावाचा कधीही राग वाटला नाही. उलट आपले काम १०० टक्के होईल हा विश्वास असायचा. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं भविष्य खूप उज्ज्वल असेल असं वाटत होतं, पण या सगळ्या अपेक्षा आज एका क्षणात संपल्या!






