
अकोल्यात बिबट्याच्या कथित वावरामुळे दहशत! (Photo Credit - X)
वनविभागाच्या पथकाकडून शोध मोहीम
अकोला वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या न्यू तापडिया नगरात शुक्रवारी (दि. २१) सकाळी बिबट्या दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) विश्वास थोरात यांच्यासह वनकर्मचारी गजानन गायकवाड, क्षेत्र सहाय्यक, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे आणि वनरक्षक एस. एस. तायडे यांचे पथक बिबट्याच्या शोधात तातडीने रवाना झाले. नागरिकांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, पथकाला बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले नाहीत. परंतु, नागरिकांनी दिलेल्या वर्णनावरून तो बिबट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
ड्रोन कॅमेऱ्यांसह गस्त वाढवली
न्यू तापडिया नगरात वनविभागाच्या बचाव पथकाची गस्त वाढवण्यात आली आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने बिबट्याच्या हालचालींवर पूर्ण लक्ष ठेवले जात आहे. बिबट्याचा माग काढण्यासाठी आणि त्याला सुरक्षितपणे अधिवासात परत पाठवण्यासाठी वनविभागाचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे.
नागरिकांसाठी तातडीच्या सूचना
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने तातडीने काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता, केवळ अत्यंत सतर्कता व संयम राखणे आवश्यक आहे:
बिबट आढळल्यास: गोंधळ घालू नका किंवा आरडाओरडा करू नका. वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ यावर किंवा वन विभाग अकोला यांच्याशी संपर्क साधून त्वरित माहिती द्यावी.
एकट्याने फिरणे टाळा: विशेषतः सायंकाळनंतर व पहाटेच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नका. समूहाने बाहेर जाणे अधिक सुरक्षित आहे.
मुलांची काळजी घ्या: मुलांना घराबाहेर एकटे खेळायला सोडू नका.
जनावरे सुरक्षित ठेवा: पाळीव जनावरांना गोठ्यात किंवा सुरक्षित जागी ठेवा.
दारांची तपासणी करा: रात्रीच्या वेळी घरांचे दरवाजे, खिडक्या आणि गॅरेजचे दरवाजे व्यवस्थित बंद आहेत याची खात्री करा.
परिसर स्वच्छ ठेवा: घराभोवती अनावश्यक गवत किंवा झुडपे असल्यास ती काढून टाकावीत. बिबट आढळल्यास त्याला त्वरित रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाची यंत्रणा सज्ज असल्याचेही कळविण्यात आले आहे.
हे देखील वाचा: Leopard : शाळेपासून अवघ्या शंभर फूटांवर बिबट्या; पालक-ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण