
ओतूर परिसरात बिबट्याची दहशत
मेंढपाळांचा ‘जागता पहारा’ अन् मृत्यूशी झुंज
ओतूर परिसरात कांदा काढणीचा हंगाम जोमात
ओतूर/मनोहर हिंगणे: जुन्नर तालुक्यातील ओतूर,रोहोकडी,डुंबरवाडी, आंबेगव्हान,खामुंडी,उंब्रज, उदापुर, डिंगोरे,अहिनवेवाडी धोलवड,ठिकेकरवाडी आणि आसपासच्या परिसरात सध्या कांदा काढणीच्या हंगामाला वेग आला आहे. शेतकरी आपल्या पिकाची आवराआवर करण्यात व्यस्त असतानाच, दुसरीकडे शेकडो मेंढपाळ कुटुंबं आपल्या उघड्यावरच्या संसारासह बिबट्याच्या छायेखाली जगतायेत. शेतात मुक्कामाला असलेल्या या मेंढपाळांना ऊन, वारा, पाऊस आणि दाट अंधाराची तमा न बाळगता दररोज रात्री ‘मृत्यूशी’ दोन हात करावे लागत आहेत.
सध्या ओतूर परिसरात कांदा काढणीचा हंगाम जोमात सुरू आहे. कांदा काढल्यानंतर जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि नैसर्गिक खतासाठी स्थानिक शेतकरी मेंढपाळांना आपल्या शेतात ‘वाडा’ (मेंढ्यांचा तळ) बसवण्यासाठी पाचारण करतात. यामुळे मेंढपाळ सध्या गावागावांतून विखुरले असून, त्यांचे वाडे थेट शेताच्या मध्यभागी आहेत. मात्र, हेच शेत आता बिबट्यांच्या हल्ल्याचे केंद्र बनले आहे. ऊसाची शेती आणि कांद्याची काढणी यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत असल्याने, मेंढपाळांच्या जनावरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.
वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट
जेव्हा संपूर्ण गाव शांत निद्रेत असते, तेव्हा ओतूरच्या शिवारात मेंढपाळांची खरी कसरत सुरू होते. हातामध्ये फक्त एक जुनी टॉर्च आणि संरक्षणासाठी एक काठी, एवढ्याच बळावर हे मेंढपाळ रात्रीचा पहारा देतात. बिबट्या अतिशय चपळाईने आणि शांतपणे हल्ला करतो, त्यामुळे जराही डोळा लागला तर शेकडो मेंढ्यांचा जीव धोक्यात येतो. रात्रीच्या किर्र अंधारात बिबट्याची डरकाळी ऐकू येताच या मेंढपाळांच्या काळजाचा ठोका चुकतो, पण आपल्या ‘धनाची’ (मेंढ्यांची) राखण करण्यासाठी त्यांना जीवावर उदार होऊन बाहेर थांबावे लागते.
गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल झाले आहेत. दुपारी कडक ऊन असते, तर रात्री अचानक सुटणारा गार वारा यांमुळे उघड्यावरचा संसार विस्कळीत होतो. मेंढपाळांकडे पक्के घर नसते; चार बांबू आणि एक प्लास्टिकची ताडपत्री म्हणजे त्यांचे घर. मुले, स्त्रिया आणि वृद्ध याच ताडपत्रीखाली आश्रय घेतात. पण या प्रतिकूल परिस्थितीतही आपला उघड्यावरचा संसार टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान या कष्टकऱ्यांसमोर आहे.
ओतूर परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय आहे. अनेकदा बिबट्या थेट मेंढ्यांच्या जाळीत घुसण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी मेंढपाळांचे पाळलेले कुत्रे धोक्याची सूचना देतात. कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येताच मेंढपाळ आरडाओरडा करत पेटत्या मशाली किंवा टॉर्च घेऊन धावतात. “आम्हाला स्वतःच्या जीवाची भीती वाटत नाही, पण आमच्या मेंढ्या हेच आमचे सर्वस्व आहे. त्या गेल्या तर आम्ही जगायचं कसं?” असा आर्त सवाल एका मेंढपाळाने उपस्थित केला आहे. वनविभागाकडून या भागात गस्त घातली जात असल्याचे दावे केले जातात, परंतु प्रत्यक्षात शेतात मुक्कामाला असलेल्या मेंढपाळांना कोणतीही सुरक्षा मिळत नाही.
‘बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्र्याला वाचवायला गेले अन् थेट…’; राजापूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार
मेंढपाळ बांधवांनी खालील प्रमुख मागण्या केल्या
सौर कंदील: वाड्याच्या चारही कोपऱ्यांवर लावण्यासाठी वनविभागाने सौर कंदील उपलब्ध करून द्यावेत.
तातडीची मदत: बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झाल्यास पंचनाम्याचा ससेमिरा टाळून त्वरित भरपाई मिळावी.
रात्रीची गस्त: ओतूर परिसरातील ज्या शेतात मेंढ्यांचे वाडे आहेत, तिथे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढवावी.
कांदा काढणीच्या या गडबडीत शेतकरी आणि मेंढपाळ यांचे नाते घट्ट असले, तरी बिबट्याच्या दहशतीने या नात्यात भीती निर्माण केली आहे. कष्टकरी मेंढपाळ समाज आजही कोणत्याही आधुनिक सोयीसुविधांशिवाय निसर्गाच्या आणि हिंस्त्र श्वापदांच्या छायेत आपला संसार रेटत आहे. ओतूर परिसरातील या ‘जागत्या पहारेकऱ्यांच्या’ समस्यांकडे शासन कधी गांभीर्याने पाहणार, हाच खरा प्रश्न आहे.