
मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न
अकोला : मूर्तिजापूर हे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील महत्त्वाचे जंक्शन असून अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेंतर्गत तब्बल १३ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून या स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. आधुनिक इमारत, आकर्षक परिसर आणि विविध प्रवासी सुविधांमुळे स्थानकाचे रूप बदलले असले; तरी महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळण्याचा प्रश्न मात्र अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोट्यवधींचा विकास झाला, पण प्रवाशांच्या प्रवासातील अडचणी कधी दूर होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावरून दर्यापूर, अचलपूर, कारंजा, दिग्रस, मंगरुळपीर यांसह परिसरातील अनेक गावांमधील प्रवासी मुंबई, पुणे, नागपूर, सूरत आणि अहमदाबादकडे प्रवास करतात. व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांसाठीही हे स्थानक महत्त्वाचे आहे. मात्र, प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आवश्यक रेल्वे (१२१३५/१२१३६) गाड्यांचे थांबे उपलब्ध नसल्याने अनेकांना अकोला किंवा बडनेरा रेल्वेस्थानक गाठावे लागते. यामुळे अतिरिक्त प्रवासखर्च आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, मूर्तिजापूर येथे महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी वर्षभरापूर्वी सत्ताधारी भाजपच्या वतीने रेल रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवून तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना मूर्तिजापूर येथे थांबा देण्याची मागणी केली होती. यामध्ये अमरावती-पुणे (११०२५/११०२६), अमरावती-तिरुपती एक्स्प्रेस (१२७६५/१२७६६) आणि नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना १ मे २०२५ पासून थांबा मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रवाशांच्या दाव्यानुसार अद्याप प्रत्यक्षात या गाड्या मूर्तिजापूर स्थानकावर थांबत नसल्याने मंजुरी आणि अंमलबजावणी यातील तफावत समोर आली आहे. त्यामुले प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई प्रवासासाठी तब्बल १८ तासांची प्रतीक्षा
मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची अडचण तर अधिकच गंभीर आहे. रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सेवाग्राम एक्स्प्रेस गेल्यानंतर मुंबईकडे जाण्यासाठी पुढील गाडी मिळेपर्यंत तब्बल १८ तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री स्तरावरून पत्रव्यवहार झाल्यानंतरही गाड्यांचे थांबे प्रत्यक्षात सुरू न होण्यामागील कारणे, रेल्वे प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा आणि मूर्तिजापूरच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
१. मूर्तिजापूर रेल्वेस्थानक कोणत्या विभागात येते?
मूर्तिजापूर रेल्वेस्थानक मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येते.
२. मूर्तिजापूर स्थानकाच्या विकासासाठी किती निधी खर्च झाला?
अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेंतर्गत १३ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.
३. विकासकामांतर्गत कोणत्या सुविधा उभारण्यात आल्या?
आधुनिक इमारत, आकर्षक परिसर आणि विविध प्रवासी सुविधांचा विकास करण्यात आला आहे.