
Akola News : विजेचा शून्य वापर, तरीही 850 रुपयांचे आले बिल; बिलाच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह
शासनाच्या माध्यमातून प्रत्येक अंगणवाडी केंद्राला वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ब्रम्ही बुद्रुक येथील अंगणवाडी केंद्रात वीज मीटर जोडणी होऊनही प्रत्यक्ष वीज वापर सुरू झालेला नाही. संबंधित केंद्रात अद्याप आवश्यक विद्युत फिटिंगची व्यवस्था नसल्याने दिवे, पंखे अथवा अन्य विद्युत उपकरणांचा वापर होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, वीज जोडणी करण्यासही सुमारे एक महिन्याचा विलंब झाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत मीटरचे रीडिंग शून्य असतानाही ८५० रुपयांचे बिल आकारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
संबंधित मीटर खासगी कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्याचे समजते. मात्र, प्रत्यक्ष वीज वापर, मीटर रीडिंग आणि आकारण्यात आलेले बिल यांची योग्य पडताळणी न करताच बिल आकारले जात असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकीकडे शासन बालकांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी अंगणवाडी केंद्रांवर विविध योजना राबवित आहे. दुसरीकडे वापरच नसलेल्या वीज जोडणीचे बिल भरण्याची वेळ येत असेल, तर हा शासकीय निधीच्या विनियोगाचा गंभीर मुद्दा ठरू शकतो. बिलाची रक्कम शासनाच्या तिजोरीतून अदा केली जाणार असली, तरी हा पैसा अखेरीस कररूपाने सामान्य नागरिकांकडूनच जमा झालेला असतो. त्यामुळे केवळ बिल आकारण्यापेक्षा प्रत्यक्ष वीज वापर आणि मीटर रीडिंगची खातरजमा करणे आवश्यक आहे.
इतर अंगणवाड्यांचीही तपासणीची गरज
ब्रम्ही बुद्रुक येथील अंगणवाडी केंद्राच्या वीज बिलाची तातडीने तपासणी करून चुकीची आकारणी झाली असल्यास ती दुरुस्त करावी. तसेच तालुक्यातील इतर अंगणवाडी केंद्रांच्या वीज बिलांचीही पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
1. अंगणवाडी केंद्राला किती रुपयांचे वीज बिल आले?
ब्रम्ही (बु.) येथील अंगणवाडी केंद्राला ८५० रुपयांचे वीज बिल आले आहे.
2. अंगणवाडी केंद्रात वीज वापर झाला होता का?
मीटर जोडणी झाल्यापासून केंद्रात प्रत्यक्ष वीज वापर झालेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
3. वीज बिलाच्या आकारणीवर प्रश्न का उपस्थित झाले आहेत?
वीज वापर नसतानाही ८५० रुपयांचे बिल आल्याने बिलाच्या आकारणीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.