
अकोल्यात भीषण पाणीटंचाई; टँकर लॉबी सक्रिय, घरगुती वापरापासून ते बांधकामापर्यंत मनमानी दर
शहराच्या विविध भागांमध्ये पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. काही भागात महापालिका पाण्याचा पुरवठा करत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत टँकर व्यावसायिकांनी आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. टँकर लॉबीने व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठी वेगवेगळे व भरमसाठ दर निश्चित केले आहेत. सध्या शहरात १ हजार लिटर ते ते ५ हजार लिटर क्षमतेचे पाणी टँकर सज्ज ठेवण्यात आले आहेत.
यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार मोहीम राबवली जात असून, विविध समाजमाध्यमातून या टँकर व्यवस्थेचे संपर्क क्रमांक पोहोचवले आहेत, जेणेकरून गरजूंना थेट त्यांच्याशी संपर्क साधता येईल. मात्र, या संपूर्ण यंत्रणेवर प्रशासनाचे किंवा महापालिकेचे कोणताही अंकुश नसल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रशासकीय दुर्लक्ष आणि भविष्यातील मोठे संकट
एका बाजूला नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असताना, दुसरीकडे टँकर लॉबी आपली दुकाने थाटून बसली आहे. या अनागोंदी कारभारावर अकोला महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाचा कोणताही वचक राहिलेला नाही. जर यावर वेळीच कठोर कारवाई केली गेली नाही, तर ही टँकर लॉबी आणखी बळकट होईल आणि नागरिकांना पाण्यासाठी मोठा मोबदला द्यावा लागेल.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा
टँकरच्या दरांचे नियमन करणे आणि अनधिकृत वारेमाप दर आकारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा, आगामी काळात अकोलेकरांना पाण्यासाठी आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. प्रशासनाने तातडीने पावले उचलून टँकर लॉबीच्या मनमानी कारभाराला चाप लावावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
१. अकोल्यात टँकर लॉबी का सक्रिय झाली आहे?
शहरातील तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांची टँकरच्या पाण्यावर अवलंबित्व वाढले आहे. या वाढत्या मागणीचा फायदा घेत खासगी टँकरचालक सक्रिय झाले आहेत.
२. टँकरचालकांकडून कोणत्या वापरासाठी पाणी दिले जाते?
घरगुती आणि पिण्याच्या पाण्यासोबतच व्यावसायिक तसेच बांधकामासाठीही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
३. नागरिकांची मुख्य तक्रार काय आहे?
टँकरच्या पाण्यासाठी मनमानी दर आकारले जात असून, प्रशासनाचे प्रभावी नियंत्रण नसल्याने आर्थिक लूट होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.