
आंबेगाव तालुक्यात महायुती फिस्कटली? 'हे' पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार
रांजणी/रमेश जाधव : आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यात महायुती फिस्कटल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे तर भाजपा स्वतंत्रपणे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. दरम्यान तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट स्वतंत्रपणे निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे होणारी निवडणूक पक्षाच्या दृष्टीने कठीण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कार्यकर्ते अद्यापही सुस्त असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला दिसून येत नाही. त्यामुळे साहजिकच होणारी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने जड जाणार हे मात्र तितकेच खरे.
कार्यकर्त्यांकडून वळसे पाटलांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न
मागील वर्षी आंबेगाव विधानसभेची निवडणूक पार पडली त्यावेळी महायुतीचे विजयी उमेदवार दिलीप वळसे पाटील केवळ पंधराशे तीस मतांनी विजयी झाले. त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांनी निकराची लढत दिली. खरे तर त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवदत्त जयवंतराव निकम आणि देवदत्त शिवाजीराव निकम या दोन उमेदवारांच्या नावात साम्य असल्याने देवदत्त शिवाजीराव निकम यांनी तीन हजाराहून अधिक मते घेतली होती. त्यामुळे दोन उमेदवारांच्या नावात साधर्म्य असल्यामुळे देवदत्त निकम यांना पराभव पत्करावा लागला आणि वळसे पाटील तांत्रिकदृष्ट्या विजयी झाले.
खरे तर वळसे पाटील यांचा झालेला विजय कदाचित त्यांनाही मान्य नसावा. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे गाव पातळीवरील स्थानिक नेते खरी राजकिय वस्तुस्थिती वरिष्ठांना सांगत नसावेत. गावात साहेब सर्व ठीक आहे, आपल्यालाच मतदान होईल, असे सांगून कार्यकर्त्यांनी वळसे पाटलांचीच दिशाभूल करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि त्याचा फटका वळसे पाटलांना विधानसभा निवडणुकीत बसला. त्यावेळी महायुतीत भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हे तीनही पक्ष एकत्र होते तरीदेखील वळसे पाटील हे थोड्याफार मताने निवडून आले.
अजित पवार गटाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची निवडणूक
आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या स्वतःच्या पारगाव – जारकरवाडी जिल्हा परिषद गटात विरोधी पक्षाचे पराभूत उमेदवार देवदत्त निकम यांनी ३०० मतांची आघाडी घेतली ही विशेष बाब आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या दृष्टीने होणारी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असून भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या महायुतीच्या मित्रपक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कितपत या निवडणुकीत यशस्वी होतो हे येणारा काळच ठरवेल. तालुक्यातील सध्याचे राजकीय चित्र पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकजूट नसल्याचे प्रकर्षाने दिसून येते. त्यातच काही ठराविक कार्यकर्ते साहेबांभोवताली सातत्याने वावरत असून वळसे पाटील यांना स्थानिक नेते आणि कार्यकर्ते सध्याची पक्षाची गाव पातळीवरील खरी राजकिय वस्तुस्थिती काय आहे हे सांगत नसल्यामुळे वळसे पाटील देखील संभ्रमात आहेत.
शिंदे गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार
आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत शिवसेना एकनाथ शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मात्र त्यांचा देखील होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीवर प्रभाव पडेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण आढळराव पाटील यांच्याबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे गटातून ठराविकच कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. तालुक्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आले आहे. त्यामुळे तालुक्यात काँग्रेस पक्ष असुन नसल्या सारखा आहे. एकुणच खऱ्या अर्थाने तालुक्यात होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या दृष्टीने अग्नीपरीक्षा ठरावी.