राज्यात (State) तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा संशयस्पद मृत्यू (Death) झाला. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. ती आणि तिचा एक मित्र ट्रेकिंगला गेले आणि त्यानंतर परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अचानक राजगडाच्या पायथ्याची या तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
दर्शना पवार असं या तरुणीचं नाव असून राहुल हांडोरे, असं तिच्यासोबत ट्रेकिंगला गेलेल्या मित्राचं नाव आहे. हा मित्र सध्या फरार आहे. याच मित्राने हत्या केली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. CCTV फुटेजपाहून हा संशय वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहेत. त्यानुसार दर्शना आणि राहुल यांच्या घरच्यांची आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी करण्यात येणार आहे.
या घटनेत समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन दर्शना आणि राहुल दोघे १२ जून रोजी राजगडावर दुचाकीने गेले होते. ६ वाजून १५ मिनिटांनी ते गडाच्या पायथ्याशी पोहचले. त्यांनी गड चढायला सुरुवात केली. मात्र, १० वाजेच्या सुमरास राहुल हा एकटाच गडावरुन येताना दिसला. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. सध्या राहूल हा बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचं मोबाईल लोकेशन बाहेर राज्यातील दिसत आहे. राहुल याने दुसऱ्यांच्या फोनवरुन माहिती दिली आहे. याप्रकणात आपण काही केलं नसल्याचं त्याने त्याच्या घरच्यांना सांगितलं आहे. पोलिसांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचं मोठ आव्हान आहे.
ओळख कशी पटली?
राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दर्शना पवार हिचे वडील दत्तात्रय पवार यांनी 12 जूनलाच मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांनी दत्तात्रय पवार यांना माहिती देत मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावून घेतलं. त्यांनी राजगडाच्या पायथ्याशी मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंवरुन दर्शनाच असल्याचं सांगितलं. दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता आणि काही भाग प्राण्यांनी खाल्लेला देखील होता, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे.