मुंबई : प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ऐंशी कोनात बदलणार आहे. असं असतानाच आता दलित समाजातील मोठे नेते, माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये युतीची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आधी दलित पँथर आणि आता कवाडे यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी काल उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. या भेटीत भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येण्यावर चर्चा करण्यात आली.
एकनाथ शिंदे यांनी या युतीला सकारात्मक प्रतिसादही दिल्याचं कवाडे यांनी सांगितलं आहे. तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये पुढील चर्चा होणार असून महापालिका निवडणुकीतच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रं आल्याचं दिसून येणार असल्याचंही कवाडे यांनी सांगितलं.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दोन्ही नेत्यांची तासभर बैठकही झाली होती. त्यात दोघांनी एकत्र मिळून निवडणूक लढण्याचा निर्णयही घेतला होता. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्यात दोन वेळा युतीबाबत चर्चा झाली. जागा वाटप आणि युतीचं स्वरुप यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी या युतीवर शिक्कामोर्तब केले जाण्याचे संकेतही मिळत आहेत.