मुख्यमंत्रिपदावरून अमित शहांचं मोठं विधान
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आज भाजपने संकप्लपत्र अर्थात जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी अमित शहा यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. सध्या तरी महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मात्र निवडणुकीनंतर महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा एकनाथ शिंदेच राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
हेही वाचा-विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे संकल्पपत्र जाहीर; ‘व्हिजन महाराष्ट्र @ 2029’ करणार प्रसिद्ध
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतून भाजप जास्त जागा लढवत आहे. शिवाय भाजपच महायुतीत मोठा भाऊ असल्याचं भाजपकडून वारंवार सांगितलं जात आहे. त्यामुळे जर या निवडणुकीत महायुती आणि महायुतीतून भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता आहे. मात्र शिंदेंसोबत सरकार बनवताना भाजपने शिंदेकडे कमी जागा असूनही त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं होतं. त्यामुळे शिंदेंना यावेली कमी जागा मिळाल्या तर भाजप पुन्हा शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची संधी देईल का? याचीही सध्या चर्चा आहे.
२०१९ निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटली. नंतर राष्ट्रावादी कॉंग्रेससोबत भाजपने सरकार बनवण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांसोबत शपथविधीही झाला मात्र अजित पवार यांनीही निर्णय बदलला. त्यामुळे काही तासांत सरकार कोसळलं आणि महाविकास आघाडी स्थापन झाली आणि राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न भंग झालं होतं. आता भाजपचा स्वत:चा मुख्यमंत्री बनवण्याची संधी आहे, मात्र महायुतीत तीन पक्ष असल्यामुळे आणि राज्यातील बेभरवशाच्या राजकारणामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळात पडेल हे सागणं कठीण असल्याचं, राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.
हेही वाचा-BJP Manifesto : दहा वर्षांत शरद पवारांनी काय विकास केला? अमित शाह यांचा थेट सवाल
भाजप जवळपास १४५-१५० जागांवर निवडणूक लढवत आहे. तर उर्वरीत १३८ जागा एकनाथ शिंदे याची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढवत आहे. महायुतीच्या या फॉर्म्युल्याचा विचार केला तर यावेळीही भाजपच्याच सर्वाधिक जागा निवडून येण्याची शक्यता आहे.
निवडणुकीला अवघे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देण्यात येणार आहेत. तसंच शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु. १२,००० वरून रु. १५,००० करणात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. तसंच प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल. वृद्ध पेंशन धारकांना महिन्याला १५०० देण्यात येत होते ते वाढवून २१०० रुपये करण्यात येतील, असं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस, पियुष गोयल तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती होती.