
Latur Municipal Election 2026, Mahayuti, BJP
लातूर येथेपत्रकार परिषदेत बोलताना निलंगेकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या जिल्हा पातळीवरील प्रमुख नेत्यांची युती करण्याची भूमिका होती. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले. या घटकांमुळेच युतीत ‘मिठाचा खडा’ पडला. राष्ट्रवादीत काँग्रेसची ‘बी टीम’ सक्रिय असल्यानेच महायुती फिस्कटल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपा ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असून उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उमेदवार निवडीत कोणत्याही व्यक्तीचा नव्हे, तर पक्षाचा निर्णय अंतिम असेल, असेही त्यांनी सांगितले. हा निर्णय जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील-मुरूमकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड व डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या सामूहिक विचारातून घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे आता लढती व रणनीतीकडे लक्ष लागले आहे.
केवळ विकासाच्या मुद्द्यांवर होणार निवडणूक
काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांना उमेदवारी नाकारल्याची चर्चा शहरात रंगली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान कांबळे तेथे उपस्थित असल्याने या चर्चेला आणखी जोर आला. २०१७ मध्ये शून्यावरून ३६ जागा जिंकत भाजपा सत्तेत आली होती. यावेळी १५ जानेवारीच्या मतदानानंतर ५० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा ठाम विश्वास निलंगेकर यांनी व्यक्त केला. ही लढाई व्यक्तीविरोधात नसून विकासाच्या मुद्यांवर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लातूर शहराची रेघ ना रेघ माहिती असलेले अत्यंत अभ्यासू नगरसेवक, ज्यांनी तब्बल सहावेळा नगरसेवकपद भूषवून आपल्या अभ्यासू भाषणानी सभागृह दणाणून सोडले असे ज्येष्ठ नेते अशोक गोविंदपूरकर यांचा पत्ता मात्र अमित देशमुखांनी कट केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या या खेळीमुळे उलट सुलट चर्चेला पेव फुटले आहे. गेल्या आषाढ महिन्यातच सत्संग प्रतिष्ठानच्या बस स्टँडवर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना तेथे उपस्थित असलेले अशोक गोविंदपूरकर यांना उद्देशून आमदार अमित देशमुख म्हणाले होते, येत्या महापालिका निवडणुकीचे स्टेअरिंग तुमच्याच हातात राहणार आहे. आज गोविंदपूरकरांना मात्र उलटा अनुभव आला. स्टेअरिंग देण्याऐवजी भैयानी तात्यांच्या राजकीय कारकिर्दीलाच ब्रेक मारला. एका संस्थाचालकासाठी एका अभ्यासू नगरसेवकाचा मात्र राजकीय बळी गेला.
लातूर महानगरपालिकेसाठी भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत असलेल्या राट्रवादीवर (अजित पवार) युती फिसकटल्याने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची वेळ आली असून, ६० जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या छाननी होणार आहे. यानंतर उमेदवारांची स्थिती समोर येणार आहे. त्यानंतर मोठ्या ताकदीने ही निवडणूक राष्ट्रवादी लढविणार आहे, यासाठी रणनीती आखण्यात आली असून, जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा माजी उपमहापौर व राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत बिराजदार यांनी केला आहे.
लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहेत. ही आघाडी म्हणजे लोकहित, सामाजिक समता आणि समावेशक विकासासाठी घेतलेला महत्वाचा निर्णय आहे. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकत्यचि मनःपूर्वक आभार, काहींना यावेळेस संधी मिळाली नसली, तरी पक्ष त्यांच्या योगदानाची नोंद घेईल याची खात्री देतो. आता ही सगळी जबाबदारी आपली आहे. सर्वांनी एकजुटीने, शिस्तबद्ध पद्धतीने काम करून लातूरच्या प्रगतीसाठी पुढे यावे, हीच अपेक्षा.
– अमित देशमुख, आमदार