भाजपचा संकल्पपत्र अमित शाह यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रचाराचा धुराळा उडाला असून आश्वासनांचा पाऊस पडतो आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्यामध्ये महायुती सरकार पुढे सुरु ठेवणार की महाविकास आघाडी सत्तास्थापन करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. सर्व राजकीय पक्षांसाठी यंदाची विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे.
सर्व राजकीय पक्षांकडून त्यांच्या पक्षाचे तसेच युतीचे जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे. यापूर्वी अजित पवार गट, उद्धव ठाकरे गट यांच्याकडून त्यांच्या पक्षाचे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानंतर आता भाजप पक्षाचा देखील जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचे संकल्पपत्र जाहीर केले जात आहेत. यामध्ये मागील सत्तेमध्ये भाजपने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता आल्यास कोणती विकासकामे केली जातील, याची माहिती देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : …मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांनी कोणाला दिला इशारा?
काय आहे भाजपच्या संकल्पपत्रामध्ये?
भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व पक्षश्रेष्ठी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. अमित शाह यांनी भाजपचे हे संकल्पपत्र जारी केले. या संकल्पपत्रामध्ये वृद्धांना 2100 रुपये पेन्शन, सत्तास्थापनेनंतर 100 दिवसांत व्हिजन महाराष्ट्र @ 2029 प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी व आशा सेविकांना 15 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. तसेच त्यांना विमा देखील दिला जाणार आहे. तसेच राज्यामध्ये 25 लाख रोजगार निर्मिती भाजप सरकारकडून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 10 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. असा अनेक आश्वासनांचा पाऊस भाजपच्या संकल्पपत्रामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार आल्यानंतर त्या सरकारचे पुढील पाच वर्षांचे कामकाज कसे असेल याचा अंदाज या भाजपच्या संकल्पपत्रातून देण्यात आला आहे.
हे संकल्पपत्र जाहीर करताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “भाजपच्या या संकल्पपत्रातून राज्यातील सर्व घटकांचा आणि त्यांच्या मागणीचा सन्मान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आठ हजारहून अधिक सूचना या संकल्पपत्रिकेसाठी आल्या. ही संकल्पत्रिका म्हणजे निकाल लागल्यानंतर अलमारीमध्ये बंद ठेवून देण्याचे डॉक्युमेंट नाही. पुढच्या काही वर्षात अंमलबजावणी करण्याचे डॉक्युमेंट आहे. प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीसाठी त्या त्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तीचा सल्ला व मदत घेण्याचे देखील ठरवले आहे. अमित शाह यांच्या मनातील संकल्प नेहमी पूर्ण होतो. त्यामुळे आता महाराष्ट्राचा संकल्पपत्र अमित शाह यांच्या हस्ते जाहीर केला जातो आहे. याचा आनंद आहे. आपला महाराष्ट्राचे राष्ट्र महा होण्यासाठी योगदान व्हावं आणि दीन, दुर्बल, शोषित घटकांची सेवा करत महाराष्ट्राची प्रगती व्हावी, हाच संकल्प करण्यात आला आहे,” असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.