विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे. आधी अजित पवार व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर आता भाजपचा देखील जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे पक्षश्रेष्ठी अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी अमित शाह यांनी महाविकास आघाडी व शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अमित शाह?
भाजपचा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्र जाहीर करण्यात आले आहे. यावेळीस अमित शाह म्हणाले की, राज्यामध्ये अराजकता पसरवणाऱ्या सरकारने विफलता आणली. यापासून धडा घेत आम्ही समृद्ध, मजबूत आणि सुरक्षित महाराष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आम्ही जेव्हा संकल्प पत्र घेऊन येतो तेव्हा आमचा संकल्प हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. महायुतीच्या सरकारने आमच्या संकल्पांना प्रत्यक्षामध्ये उतरवले आहे. अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी भाजपने करुन दाखवल्या आहेत, असे मत अमित शाह यांनी व्यक्त केले.
पुढे अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधाला. ते म्हणाले की, कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्याला वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत विनम्रतेचे शब्द बोलायला उद्धव ठाकरे सांगू शकतात का? ज्या संविधानाची शपथ त्यांनी लोकसभेमध्ये घेतली त्यामध्ये ते रिकामी पानं देत आहेत. त्यावर एक अक्षर नव्हतं. याहून भारताच्या संविधानाचा मोठा अपमान कधी झाला नव्हता. उद्धव ठाकरेंना कुठे बसायचं हे त्यांनी ठरवलं आहे. जे वीर सावरकर यांचा अपमान करतात, राम मंदिराला विरोध करतात, जे संभाजीनगर नावाचा विरोध करतात अशा लोकांसोबत तुम्ही बसलेले आहात, असे मत अमित शाह यांनी व्यक्त केले.
अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2024 या वर्षांमध्ये महाराष्ट्राला 10 लाख 15 हजार 890 करोड रुपये दिले. आघाडीच्या सरकारने महाराष्ट्राला काय दिलं याचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवावा. 10 वर्षांमध्ये शरद पवार यांनी काय केलं? केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना तुम्ही महाराष्ट्रावर अन्याय केला. आता हे सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येत नाही. मी आघाडीच्या मित्रांना ही आठवण करुन देतो की तुमच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्र खाली घसरत होता. शरद पवार हे ज्या प्रकारची आश्वासनं देत आहेत आणि ज्या प्रकारचे मुद्दे उपस्थित करतात, याचा सत्याशी लांब लांब पर्यंत संबंध नसतो. खोटे आरोप करुन एक वातावरण निर्मिती करुन खोटा जनादेश घेतात. पण हे यावेळी सफल होणार नाही, असा घणाघात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.