अक्षय फाटक, पुणे : शांतताप्रिय शहरात नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच टोळी युद्धातून झालेल्या गँगस्टर शरद मोहोळचा खून व त्यामुळे पुन्हा टोळी युद्ध भडकण्याची असलेली शक्यता त्यासोबतच अल्पवयीन मुलांचे वाढते उपद्व्याप आणि दहशत माजवत गाड्यांची होणारी तोडफोड व पुणेकरांच्या दैनंदिन जीवनात सातत्याने असलेली वाहतूक समस्या तसेच स्मार्ट पुणेकरांच्या मानगुटीवर बसलेले सायबर गुन्हेगारीचे भूत तर शिक्षणाच्या माहेर घराचे अमली पदार्थ तस्कारी विणलेले जाळे अशा चहूबाजूंनी वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान नव्या पोलीस आयुक्तांसमोर असणार आहे. त्यामुळे नवे आयुक्त पुणेकरांचे “समाधान” करणार की नित्याच्याच भयभित वातावरणात पुणेकर राहणार हे पाहवे लागणार आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. गृहविभागाने त्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी काढले. अमितेश कुमार हे कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील सट्टेबाजी उघड करून त्यांनी क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून अमितेश कुमार हे देशासह परदेशातही ओळखले जाऊ लागले होते.
पण, नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर शहराला शांतताप्रिय ठेवण्याचे आव्हान असणार आहे. त्यासोबतच कायदा सुव्यवस्था तसेच संभाव्य निवडणूकांचे वातावरण आणि त्या शांतपणे पार पाडणे तर गुन्हेगारांवचक ठेवावा लागणार आहे. अमितेश कुमार यांची पहिल्यांदाच नोकरीच्या निमित्ताने शहरात नियुक्ती झाली आहे. नागपूर शहराच्या तुलनेत पुण्याचा विस्तार मोठा आहे. वाढती लोकसंख्या, पुण्याचा विस्तार तसेच त्यासोबतच वाढत चाललेली गुन्हेगारी व बदलता गुन्हेगारीचा ट्रेंड यामुळे पुण्यात कायम उपनगरांचा भाग दहशतीत असल्याचे दिसते. वाहनांची तोडफोड, अल्पवयीन मुलांचे उपद्व्याप आणि मारामाऱ्या, नव्याने पुण्यात निर्माण झालेल्या गुन्हेगारी टोळ्यांमुळे कायमच गंभीर घटना घडत आहेत. त्यामुळे जुन्या गुंडासह नव्याने निर्माण झालेल्या या भाईंवर वचक बसविणे गरजेचे राहणार आहे.
वर्षागणिक गुन्हेगारीतील पुण्यातील अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत चालला आहे. अनेक प्रयत्नानंतर त्यांना गुन्हेगारीच्या दलदलीतून बाहेर काढता येत नसल्याचे वास्तव आहे. ही मुल व्यसनांच्याही आहारी गेली आहेत. वाहन चोरी, खून, खूनाचे प्रयत्न, वाहन तोडफोडसह गंभीर गुन्ह्यात सहभाग आढळला आहे. दोन हजारांच्या जवळपास अल्पवयीन मुलं असल्याचे पोलीस नोंदीवरून समोर आले आहे. मुले गुन्ह्यानंतर अल्पवयीन असल्याने काहीच दिवसात पुन्हा बाहेर येत असल्याने आणि त्यांना पोलीस खाकीचा प्रसादच माहिती नसल्याने त्यांच्यात भितीपेक्षा आणखीनच बळ येत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या मुलांवर वचक बसविण्यासोबतच ठोस उपाययोजना करणे गरजेचे असणार आहे.
गेल्या वर्षात गुन्हे शाखासह स्थानिक पोलिसांनी अमली पदार्थांचे कंबरडे मोडत दहा वर्षांतील उचांकी कारवाई केली. त्यामुळे पुण्यातील अमली पदार्थांची गरजही उघड झाली आहे. तस्करांनी शहराला विळखा घातल्याचे वास्तव आहे. त्यामुळे हा विळखा मोडीत काढत कारवाईत सातत्य ठेवावे लागणार आहे.
महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण व पोलीस असा ताळमेळ घालत वाहतूक नियोजन देखील करावे लागणार आहे. मुंबईनंतर पुण्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण आहे. वर्षाला २० हजार तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच गु्न्ह्यांची उकल करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या, तांत्रिक मदत, पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. यासोबतच सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती मोहीमेवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
३७ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
गेल्या वर्षात (२०२३) पुणे पोलिसांनी शहरातील तब्बल ३६ हजार ८१६ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मोक्का, एमपीडीएसह महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच इतर कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
वर्षात साडे अकरा हजार गुन्हे दाखल
शहरात वर्षभरात ११ हजार ५५९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ७ हजार ६८५ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. यामध्ये गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. तर, सायबरच्या २० हजार तक्रारी प्राप्त आहेत. त्यातील काहीच गुन्हे नोंद झाले असून, ते गुन्हे उघडकीस येण्याची प्रमाण कमी आहे.
खून (दाखल-९७, उघड-९४ )
खूनाचे प्रयत्न (दाखल- २३३, उघड- २३०)
दंगा (दाखल-२१४, उघड- २१२)
दुखापत (दाखल- १३६५, उघड- १३१७)
शरीराविरूद्धच्या गुन्ह्यात वर्षात १९०९ गुन्हे नोंदवले असून, त्यातील १८५३ गुन्हे उघड झाले आहेत. यामध्ये जबरी चोरी, चैन चोरी, दरोडा, मोबाईल चोरी, इतर जबरी चोरी, घरफोड्यांसह दरोड्याची तयारी या गुन्ह्यांचा समावेश आहे.