
पुणे शहरात मकरसंक्रातीचा उत्साह
बंदी असून देखील नायलॉन मांजाची विक्री सुरू
छुप्या मार्गाने विक्री आणि वापर
पुणे: पुणे शहरात जानेवारी महिन्यात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून येते. मात्र, पतंग कापण्याच्या स्पर्धेत जिंकण्याच्या हव्यासापोटी बंदी असलेला नायलॉन (चिनी) मांजा सर्रास वापरला जात. आहे. मात्र तो मांजा नागरिक, प्राणी आणि विशेषतः पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. शासनाने नायलॉन मांजावर कडक बंदी घातलेली असतानाही पुण्यात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने त्याची विक्री आणि वापर सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव ‘नवराष्ट्र’च्या पाहणीत समोर आले आहे.
गेल्या आठवडाभरात नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होण्यासह अनेक नागरिक अपघातग्रस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘नवराष्ट्र’तर्फे कात्रज, धनकवडी, कोंढवा, लष्कर, पर्वती तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात पाहणी करण्यात आली. या ठिकाणी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत अनेकजण सर्रास नायलॉन मांजाचा वापर करत असल्याचे दिसून आले.
यासंदर्भात संवाद साधला असता एका तरुणाने स्पष्ट कबुली देत सांगितले की सुती मांजामुळे पतंग पटकन कापली जाते. पेच जिंकण्यासाठी नायलॉन मांजाच जास्त प्रभावी असतो. बंदी असल्याची पूर्ण माहिती असूनही साधारण एक हजार रुपये खर्चून नायलॉन मांजाचे बंडल छुप्या मार्गाने खरेदी केले जात असल्याचेही समोर आले.
हेल्मेट, स्कार्फमुळे वाचला ‘तिचा’ जीव; नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा
पोलीस कारवाईची भीती असल्याने हा व्यवहार गुप्तपणे केला जात असला, तरी शहरातील गल्लीबोळांतील अनेक व्यापाऱ्यांकडे आजही हा घातक मांजा उपलब्ध आहे. कोणताही ठोस धाक नसल्याने बंदी असलेला ‘चिनी मांजा’ सहजपणे मुलांच्या हातात पोहोचत असल्याचे भयावह चित्र पाहणीतून उघड झाले आहे.
पतंगांच्या कापाकापीनंतर कागद व मांजा रस्त्यावर फेकला जातो. हा मांजा विजेच्या तारा, केबल, झाडे आणि खांबांना अडकून अपघातांचे कारण ठरत आहे. शहरातील विविध भागांत नागरिकांच्या मानेला, हातांना आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कावळे, कबुतरे, घार, चिमण्या, साळुंखी, वटवाघळे यांसारखे पक्षी या मांजामध्ये अडकून जखमी होणे किंवा मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. काहींना कायमचे अपंगत्वही आले आहे.
नायलॉन मांजावर बंदी असतानाही सर्रास विक्री
मानव, प्राणी आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने २०१७ मध्ये नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. बंदीचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. मात्र, या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. शहरात आजही नायलॉन व काचेरी मांजाची खुलेआम विक्री सुरू असून, पोलिस प्रशासनाची कारवाई केवळ नावापुरतीच असल्याची नागरिकांची भावना आहे.
कारवाई फक्त सणापुरती?
मकरसंक्रांत जवळ आली की कारवाईचे हत्यार उपसले जाते; मात्र ती बहुतांशी कागदोपत्रीच मर्यादित राहते. उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर ठोस कारवाई होत नसल्यानेच हा जीवघेणा मांजा आजही वापरात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर आणि वापरावर तातडीने कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.