नागपूर : अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आक्रमक व चूरशीची ठरली. भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी देखील दिनेश बूब यांना उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. अमरावतीमध्ये कॉंग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांचा तब्बल 19 हजार मतांनी पराभव केला. यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर यायचं टाळलं होतं. पराभवानंतर पहिल्यांदा नवनीत राणा माध्यमांसमोर आल्या असून त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.
नवनीत राणा यांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली. दिल्लीहून परत येताना नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पराभवाचे कारण शोधत असल्याचे सांगितले. नवनीत राणा म्हणाल्या, “पाच वर्षांपूर्वी जनतेने मला अमरावतीचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी मला दिल्लीला पाठवलं होतं. परंतू, यंदा मला त्यांनी का थांबवलं, हे मला अजूनही समजू शकलेलं नाही. मात्र, हा पराभव म्हणजे शेवट नाही, गेल्या पाच वर्षांत मी प्रमाणिकपणे काम केलं आहे,” असे मत राणा यांनी मांडले. त्याचबरोबर बच्चू कडू यांनी दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे त्यांना देखील नवनीत राणा यांनी टोला लगावला. राणा म्हणाल्या, “काही लोक मैदान जिंकण्यासाठी निवडणूक लढवतात, तर काही लोक दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करतात,” असा टोला नवनीत राणा यांनी लगावला.
नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत व उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, “मी एवढंच म्हणेन की दिवसा स्वप्न बघणाऱ्या उद्धव ठाकरेंना माहिती नाही की आम्ही महाराष्ट्रात किती काम केलं आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील जनता आम्हालाच प्रतिसाद देईल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमधील मतांचं प्रमाण बघा. भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पोपटाचं ऐकण्याची आवश्यकता वाटत नाही. तसेच उद्धव ठाकरे ज्या सुरात नरेंद्र मोदींना निमंत्रण देऊ असं बोलत होते, त्यांनी आता पाहिलं असेल की खरा वाघ कोण आहे. तसेच मला वाटतं की मी आता पराभूत झाले आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता हनुमान चालीसा पठण करायला हवी,” असे आव्हान नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.