
मात्र, गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढल्यामुळे मुंबईतील मराठी मतदारांची संख्या पूर्वीइतकी राहिलेली नाही. अशा परिस्थितीत, मराठी मतदार ठाकरे बंधूंकडे झुकल्यास अमराठी मतदारांची भक्कम व्होटबँक आपल्या बाजूने उभी राहावी, यासाठी भाजपने खास रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने व्यापक आणि आक्रमक प्रचाराची रणनीती आखली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ग्राऊंड लेव्हलवर उतरून प्रत्येक बूथवर भाजपचा प्रचार करणार आहेत. ब्रँड ठाकरेला शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मुंबईत सहा प्रचारसभा घेणार असून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ते मुंबईत तळ ठोकण्याची शक्यता आहे.
याशिवाय, भाजपची भक्कम अमराठी व्होटबँक एकत्र करण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. अमराठी मतदारांमध्ये प्रभावी मानले जाणारे हिंदुत्वाचे कार्ड पुढे करत नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या आक्रमक नेत्यांना मुंबईत उतरवले जाणार आहे. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, रवी किशन आणि निरुहा हे पाच उत्तर भारतीय चेहरे मुंबईतील अमराठी बहुल भागांमध्ये प्रचारसभा घेणार असल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची युतीदार शिवसेना (शिंदे गट) मायक्रो-प्लॅनिंगवर भर देत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाखाप्रमुखांना प्रत्येक घरात जाऊन प्रचार करण्याचे आदेश दिले असून यासाठी ‘लक्ष्यवेध’ अॅपचा वापर करण्यात येत आहे. तसेच मतदानाला येऊ न शकणाऱ्या वृद्ध मतदारांवर लक्ष ठेवून त्यांची पोस्टल मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी ग्राऊंड लेव्हलवर विशेष प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, राज आणि उद्धव ठाकरे यांच्या जोडीनेही प्रचाराला वेग आला आहे. दोघे आजपासून मुंबईतील विविध शाखांना भेटी देणार असून प्रचाराची सुरुवात लालबागेतील प्रभाग क्रमांक 204 मधील शाखेतून होणार आहे. त्यानंतर वरळीतील शाखेला भेट दिली जाणार आहे. उद्धव ठाकरे एकूण 12 शाखांना भेट देणार असून राज आणि उद्धव ठाकरे चार ते पाच शाखांमध्ये एकत्र फिरणार आहेत. याशिवाय, आज विक्रोळीत ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होणार आहे.