महाराष्ट्राला मान ! राज्यातील 'या' शहराची हवा देशात ठरली सर्वांत शुद्ध; 200 पैकी 200 गुण
अमरावती : शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाते. त्यात स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 या स्पर्धेत 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने 200 पैकी 200 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नवी दिल्ली येथील गंगा ऑडिटोरियम, इंदिरा पर्यावरण भवन येथे पार पडलेल्या समारंभात अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. इंदोर, जबलपूर, आग्रा आणि सुरत या शहरांनाही पुरस्कृत करण्यात आले. भारतातील १३० शहरांमध्ये स्वच्छ हवा आणि हरित पायाभूत सुविधांसाठी १.५५ लाख कोटी रुपयांहून अधिक निधी उभारण्यात आला आहे. अमरावतीने २०० पैकी २०० गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. ७५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले आहे.
अमरावतीने ३४० किमी लांबीच्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली आहे, ज्यामध्ये शेवटपासून शेवटपर्यंतचे फुटपाथ समाविष्ट आहे आणि ५३ बागांमध्ये व्यापक हिरवळ केली आहे.
अमरावतीसाठी गौरवाची बाब
स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावतीने देशात पहिले पारितोषिक पटकावणे, ही संपूर्ण शहरासाठी गौरवाची बाब आहे. ही केवळ महानगरपालिकेची नाही, तर अमरावतीतील प्रत्येक नागरिकाची एक सामूहिक उपलब्धी आहे. या यशामध्ये स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा, अभियंत्यांचा, पर्यावरण तज्ज्ञांचा, आणि सर्वसामान्य नागरिकांचा मोलाचा वाटा आहे.
इंदूरचाही नंबर पहिला
१० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गटात २०० पैकी २०० गुणांसह इंदूरने पहिला क्रमांक पटकावला. १.५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले आहे. इंदूरने गेल्या वर्षी १६ लाखांहून अधिक झाडे लावली आहेत, ज्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले गेले आहे.