
पाण्याची टाकी असूनही कृत्रिम पाणीटंचाई! नदीवर अवलंबून राहण्याची वेळ; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा
Amravati News: दर्यापूर तालुक्यातील खल्लार परिसरातील मलकापूर गावात गत दोन वर्षांपासून पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. लाखो रुपये खर्च करून पाण्याची टाकी उभारली, मात्र त्यात पाण्याचा थेंबही नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मलकापूर ग्रामस्थांची अवस्था बिकट झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी चंद्रभागा नदीच्या पात्रावर अवलंबून राहण्याची वेळ ग्रामस्थांवर आली असून पाणीप्रश्नाचा कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही तर आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निम्म्याहून अधिक ग्रामस्थांनी दिला आहे.(फोटो सौजन्य – istock)
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधातील ग्रामस्थांचा रोष आता उफाळून आला आहे. गावातील पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने २ वर्षांपूर्वी नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी या टाकीत अद्याप एक थेंबही पाणी साठलेले नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्चुन उभारण्यात आलेली ही टाकी ग्रामस्थांसाठी केवळ शोभेची वास्तू ठरली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित दुर्लक्षामुळे पाणीपुरवठ्याची समस्या कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एकीकडे पाण्याची टाकी उभी आहे, तर दुसरीकडे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
खल्लार परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य टाकी चंद्रपूर येथे आहे. तेथून लांडी गावातील टाकीत पाणी सोडले जाते आणि त्यानंतर मलकापूरला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था आहे. मात्र, गत २ वर्षांपासून ही संपूर्ण यंत्रणाच विस्कळीत झाली आहे. गावात नळाला पाणी येत नसल्याने महिला आणि ग्रामस्थांना चंद्रभागा नदीच्या पात्रातून डोक्यावर पाणी वाहून आणावे लागत आहे. विशेष म्हणजे नदीचे पाणी वापरण्याची वेळ आल्याने त्याच्या गुणवत्तेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. दूषित पाण्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक
८८ आम्ही दोन वर्षांहून अधिक काळापासून या पाणीटंचाईचा सामना करीत आहोत. समस्या सोडविण्यासाठी अनेक नेते आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी केली; मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे पाणीप्रश्न सुटेपर्यंत गावातील निम्म्याहून अधिक नागरिक कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाहीत, असा निर्णय घेतला आहे, अशी माहिती – अशोकराव मोहोड, ग्रामस्थांनी दिली आहे.
पाण्यासारख्या मुलभूत सुविधेसाठी दोन वर्षे प्रतीक्षा करूनही समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने आता ‘पाणीप्रश्न सुटेपर्यंत मतदान नाही’ अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. आता प्रशासनच्या कृतीकडे मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे.