
ताडोबाच्या बफर गावात आता तारू उद्यान! सुरक्षित खेळाच्या जागेसह पर्यावरण शिक्षण
Amravati News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित सामुदायिक जागा निर्माण करण्यासाठी ‘तारू उद्यान’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. भामडेली आणि हळदी यांसह बफर क्षेत्रातील काही गावांमध्ये तारू उद्याने उभारण्यात आली असून, आणखी काही उद्यानांचे काम सुरू आहे. बफर भूप्रदेशातील सर्व गावांमध्ये तारू उद्याने उभारण्याचे उद्दिष्ट ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने निश्चित केले आहे.(फोटो सौजन्य – istock)
Amravati News: एचएसआरपी नसलेल्या ९१९ वाहनांवर कारवाई! पहिल्यांदा पकडल्यास ५०० ते १००० रुपयांचा दंड
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात शंभरहून अधिक गावे आहेत. या गावांमध्ये नागरिक आणि वन्यजीव एकाच भूप्रदेशात वावरत असल्याने मानव वन्यजीव संघर्षाचे प्रसंग उद्भवतात. वाघ, बिबट्या, अस्वल, गौर यांसह विविध वन्यजीवांची वर्दळ गावांच्या लगतच्या भागातही वाढली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पालक मुलांना मोकळ्या जागेत खेळण्यासाठी पाठविताना सुरक्षिततेचा विचार करतात. भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचाही धोका आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीही सुरक्षित विरंगुळा आणि सामाजिक संवादासाठी सार्वजनिक जागांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित, कुंपणयुक्त आणि पर्यावरणपूरक सामुदायिक जागा म्हणून तारू उद्यानांची संकल्पना पुढे आली आहे.
‘तारू’ हे नाव जंगलांचे पौराणिक संरक्षक मानल्या जाणाऱ्या तारू देवाच्या नावावरून देण्यात आले आहे. त्यामुळे या उद्यानांच्या माध्यमातून ताडोबा परिसराची सांस्कृतिक ओळख आणि निसर्गाशी असलेले पारंपरिक नातेही जपण्याचा प्रयत्न आहे. ग्रामपंचायतीने ग्राम पर्यावरण विकास समितीच्या सल्लामसलतीने निश्चित केलेल्या सामुदायिक जमिनीवर ही उद्याने विकसित केली जात आहेत. उद्यानांमध्ये चेन-लिंक कुंपण, प्रवेशद्वार, मुलांसाठी खेळाची साधने, चालण्यासाठी पायवाटा, बसण्यासाठी बाके, सौर प्रकाश व्यवस्था, कचरापेट्या आणि पर्यावरणविषयक माहिती फलकांचा समावेश करण्यात येत आहे. स्थानिक वृक्ष व झुडपांच्या प्रजातींच्या माध्यमातून उद्यानांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून प्रत्येक सहभागी गावात ‘फ्रेंड्स ऑफ तारू’ बाल क्लब स्थापन केला जाणार आहे. स्थानिक शालेय विद्यार्थ्यांचा या क्लबमध्ये सहभाग असेल, उद्यानांची देखभाल, वृक्षांना पाणी देणे, स्वच्छता मोहिमा, पक्षीनिरीक्षण, निसर्गभ्रमंती आदी उपक्रमात विद्यार्थी सहभागी होतील. पर्यावरण दिन, वन्यजीव सप्ताह आणि वसुंधरा दिन यांसारखे दिवसही विविध उपक्रमांनी साजरे केले जातील. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जंगल, वन्यजीव आणि जैवविविधतेविषयी जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.