
व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडले ३३२२ तरुण, अमरावती विभागातील व्यसनमुक्ती केंद्रातर्फे यशस्वी पुनर्वसन
अमरावती : राज्यात वाढत्या ड्रग्ज व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना नवसंजीवनी देण्याचे काम व्यसनमुक्ती केंद्रांकडून सुरू आहे. २०२४-२०२५ या वर्षात अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांतील शासकीय व खासगी व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये दाखल झालेल्या हजारो व्यसनींना यशस्वी उपचारांमुळे पुन्हा नव्या आयुष्याची संधी मिळाली आहे. मात्र, उपचारादरम्यान काही रुग्णांचे केंद्रातून पळून जाणे ही चिंतेची बाब ठरत आहे. राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये २०२४-२०२५ या वर्षात मोठ्या संख्येने ड्रग्ज व्यसनी उपचारासाठी दाखल झाले. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांमधील व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये एकूण ३ हजार ४०४ रुग्णांनी उपचारासाठी नोंदणी केली. यापैकी ३ हजार ३२२ रुग्णांनी यशस्वीपणे उपचार पूर्ण करून व्यसनाच्या दलदलीतून बाहेर पडत घरी परतण्याचा मार्गे मिळविला आहे.
दरम्यान, उपचार सुरू असतानाच ११६ रुग्ण केंद्रातून पळून गेल्याची नोंद आहे. ही बाब प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची ठरत आहे. विशेष म्हणजे, उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्ण हे १८ ते ३० वयोगटातील तरुण आहेत. ड्रग्ज व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त झाल्याचे वास्तव या आकडेवारीतून समोर येत आहे. व्यसनमुक्ती केंद्रांतील उपचारांचा यशाचा दर समाधानकारक असला, तरी काही रुग्णांचे उपचार अपूर्ण राहणे ही गंभीर बाब आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासोबतच समुपदेशनाची प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, व्यसनमुक्ती केंद्रातून रुग्ण पळून जाण्यामागे अनेक कारणे आहेत. काही केंद्रांमध्ये असलेली कठोर शिस्त, उपचारादरम्यान मादक पदाथांची तीव्र ओढ, नैराश्य व चिंतेसारख्या मानसिक समस्या तसेच कुटुंबीयांचा पाठिंबा नसणे किंवा उपचारासाठी प्रेरणेचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अमरावती, नागपूरसह अनेक शहरांमध्ये शासकीय व खासगी व्यसनमुक्ती केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधांनुसार उपचार शुल्क २५००० रुपयांपासून ते ३ लाख रुपयांपर्यंत आहे. उपचार अभ्यासक्रमांचा कालावधी १८ दिवसांपासून ६ महिन्यांपर्यंत आहे. काही गैरप्रकार करणाऱ्या केंद्रांवर सरकारने वेळोवेळी कारवाई केली आहे. केंद्रातून पळून गेलेल्या रुग्णांची माहिती तत्काळ पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते.
गेल्या काही वर्षांपासून दारू, गांजा तसेच इतर अमली पदार्धाचे गंभीर व्यसन असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये दाखल होत आहेत. या रुग्णांवर यशस्वी उपचार होत आहेत. त्यांच्या माध्यमातून मादक पदार्थाच्या तस्करीविषयी महत्त्वाची माहितीही पोलिसांना मिळत आहे. ड्रग्ज तस्करांचे जाळे उघडकीस आल्याचे समजते.
‘ व्यसनमुक्ती केंद्रातून बरे होऊन बाहेर पडलेल्या रुग्णाचे अनुभव प्रेरणादायी आहेत. योग्य उपचार व कुटुंबीयांच्या पाठिव्यामुळे आयुष्य पबदलल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. उपचारानंतर त्यांना कुटुंबाच्या प्रेमाचे मोल कळले.