अमरावतीमध्ये वाहतुकीत बदल (फोटो- istockphoto)
अमरावतीमध्ये मतमोजणीच्या दिवशी वाहतुकीत बदल
गुरुवारी रात्रीपासून काही मार्ग बंद
मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट बंदोबस्त
अमरावती: अमरावती मनपा निवडणूक मतमोजणीच्या पाश्र्वभूमीवर अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रिया शुक्रवारी (दि. १६) डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडा व वाणिज्य संकुलात सकाळी दहा वाजतापासून सुरू होणार आहे. मतदान प्रक्रिया गुरुवारी (दि. १५) आटोपल्यानंतर मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट आदी साहित्य घेऊन वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ मतमोजणी केंद्र परिसरात राहणार आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजतापासून संबंधित अधिकारी, उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने नवसारी परिसरात दाखल होणार असल्याने वाहतूक कोंडी, अपघात किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
पर्यायी मार्ग निचित: वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आलेत. यात पंचवटीकडून नवसारीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी कठोरा नाका- रंगोली लॉन कटोरा जकात नाका या मार्गाचा वापर करावा. राजपूत ढाब्याकडून पंचवटीकडे येणाऱ्या वाहनांसाठी राजपूत डाबा-रिंगरोड-पोटे पाटील चौक कठोरा नाका किंवा राजपूत ढाबा रिंगरोड पोटे पाटील चौक रहाटगाव टी-पॉईंट हा मार्ग वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाहतूक विभागानुसार, नमूद कालावधीत वाहतूक बदलांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोटार वाहन कायदा, १९८८ आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नव्याने जारी आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे.
पोलिसांचे आवाहन
मतमोजणी कालावधीत लागू करण्यात आलेल्या निबंधांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, जेणेकरून मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडेल, असे आवाहन पोलिस आयुक्तालय व वाहतूक विभागातर्फे करण्यात आले.
‘या’ मार्गावर प्रवेश बंद
कठोरा ते छत्रपती संभाजी महाराज चौक (राजपूत ढाबा चौक) हा मार्ग १५ जानेवारीला रात्री १० वाजतापासून १६ जानेवारीला संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत बंद राहणार आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






