एकाला सापाचा डंख; दुसरा तोंडानं विष काढताना चक्कर येऊन पडला अन्...
सोलापूर : सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऊस तोडीच्या निमित्ताने फडात काम करताना अचानक एकाला सापाने दंश केला. सापाचं हे विष चढू नये म्हणून दुसऱ्यानं तोंडाद्वारे विष बाहेर फेकण्याचा प्रयत्न करताना तो चक्कर येऊन फडातच कोसळला. रविवारच्या रात्री ८:३० च्या सुमारास किणी (ता. अक्कलकोट) येथे आगरखेडे यांच्या शेतातील फडात ही घटना घडली आहे. रामसिंग ढाकूलाल चतूर (वय ३२), करण रामसिंग जावरकर (वय ३०, रा. पानखल्या, ता. धरणी, जि. अमरावती) अशी या दोघांची नावे आहेत. सध्या ऊसतोडीचे दिवस असल्याने गावोगावी कारखान्यामार्फत ऊसतोडीची टोळी फडामध्ये आहे.
अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे राजू आगरखेडे यांच्या शेतात रविवारी रात्री ८:३० च्या सुमारास वरील दोघे मजूर ऊसतोडीचे काम करीत होते. रात्रीच्या अंधारात कोयत्यानं सपासप ऊसतोड सुरू असताना अचानक करण याच्या उजव्या पायाला सापाने कडकडून चावा घेतला. त्रास होऊ लागल्याने जागेवरच विहळू लागला. त्याचा जोडीदार रामसिंग याने प्रसंगावधान राखून सापाचे विष शरीरात भिनू नये यासाठी तोंडाने ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना तो चक्कर येऊन फडात पडला. यामुळे त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. तातडीने दोघांना मदतनीस शाहरुख पठाण याच्या मदतीने रविवारी रात्री १०:२५ च्या सुमारास थेट सोलापूरला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे सुद्धा वाचा : पुण्यात मदतीच्या बहाण्याने दोघांची फसवणूक; ATM चा पासवर्ड घेतला अन्…
काय काळजी घ्याल?
पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण तसंच शहरी भागांमध्ये सापाचा मोठा वावर असतो. विषारी सापाच्या दंशाने वेळीत उपचार न झाल्यास त्यात एखाद्याच्या जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे साप चावल्यानंतर तातडीनं काही खबरदारीचे उपाय करणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने, बेडकांच्या शिकारीसाठी, प्रजनांसाठी अशा अनेक कारणांसाठी साप बाहेर पडत असतात. त्यावेळी सर्पदंश होऊ नये म्हणून विशेषत: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पायात लांब जोडे घालावे. अनोळखी ठिकाणी हात घालताना काठीने शहानिशा करावी. साप हा निसर्गाचा आणि शेतकऱ्यांचा मित्र असून त्यांचा अधिवास निसर्गात महत्त्वाचा आहे. साप दिसल्यास त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क करून सुरक्षित ठिकाणी त्याला सोडावे.
300 पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती
‘आपल्या देशात 300 पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती आहेत. त्यामधील 15-20 टक्के प्रजाती या विषारी सापाच्या प्रजाती आहेत. त्यामधील नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे 4 विषारी साप मानवी वस्तीत आढळतात. मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सापांमध्ये यांचा सर्वाधिक समावेश आहे. तसेच ग्रामीण भागात हे मृत्यू जास्त होतात.