संग्रहित फोटो
पुणे : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना मदत करण्याचा बहाणा करून फसवणूक केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये या घटना घडल्या आहेत. पैसे काढून देताना नागरिकांकडून पासवर्ड घेतला आणि हातचालाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले. नागरिक गेल्यानंतर परस्पर त्यांच्या खात्यातून पैसे काढले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. पहिली घटना २३ नोव्हेंबरला सायंकाळी पावणेसहा ते साडेसहाच्या सुमारास घडली.
पहिल्या घटनेतील ५० वर्षीय तक्रारदार नवी पेठ परिसरात आले होते. त्यावेळी ते महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी मदत करतो, असे सांगितले. त्यासाठी अनोळखी व्यक्तीने तक्रारदाराकडून एटीएमचे कार्ड घेतले व पासवर्ड विचारला. पैसे काढण्याचा बहाणा करून संबंधिताने हातचालाखीने कार्ड बदलले आणि पैसे निघत नाहीत, असे सांगितले. नंतर अनोळखी व्यक्ती आणि तक्रारदार तेथून निघून गेले. थोड्या वेळाने अनोळखी व्यक्तीने तक्रारदाराच्या एटीएम कार्डचा वापर करून १० हजार रुपये काढून घेतले.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तडीपार गुंडासह साथीदारांना ठोकल्या बेड्या
दुसरी घटना २४ नोव्हेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याच एटीएममध्ये घडली. याप्रकरणी कोथरूडमधील ५४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, ते मशीनमध्ये कार्ड टाकत होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने त्यांना हटकले. ‘कार्ड असे नाही टाकायचे,’ असे म्हणून अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातून कार्ड घेतले आणि योग्य पद्धतीने कार्ड टाकले, असे भासवले. मात्र, हे करताना त्याने तक्रारदाराचे कार्ड हातचालाखीने बदलले. या दोन्ही घटनातील आरोपी एकच असण्याची शक्यता असून, विश्रामबाग पोलीस याचा तपास करीत आहेत.
सदाशिव पेठेत भरदुपारी फ्लॅट फोडला
पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, सदाशिव पेठेत भरदुपारी अवघ्या पाऊण तासात बंद फ्लॅट फोडत १८०० अमेरिकन डॉलर चोरून नेले आहेत. या सोबतच मुकूंदनगरमध्ये देखील फ्लॅट फोडण्यात आला आहे. दोन घटनांत चार लाखांचा ऐवज चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडण्याचा धडाका लावला असून, या चोरट्यांचा थांगपत्ता मात्र पोलिसांना लागत नसल्याचे दिसत आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.