
पन्हाळा: पन्हाळा नगरपरिषदेला जिल्हाधिकाऱ्यांनी सि.स.नंबर ६३५ येथील शिवस्मारकासाठी ताबा दिलेल्या जागेचा चुकीचा फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजीव सोरटे कार्यकर्त्यांसह सोमवारी सकाळी पन्हाळा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे लाक्षणिक उपोषणासाठी बसले असता उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे यांनी त्या जागेचा चुकीचा फेरफाराची सुनावणी घेवुन निर्णय घेत असल्याचे पत्र दिल्याने उपोषण सायंकाळी समाप्त करण्यात आले.
पन्हाळा शहरातील शिवतीर्थ तलावाच्या जवळील जागा सि.स.नंबर ६३५ यातील जागा पर्यटन विकास महामंडळ, पंचायत समिती व नगरपरिषदेकडे शिवस्मारक करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतरित केली आहे. दरम्यान यातील लिजवर दिलेली अठ्ठावीस गुंठे जागा १९५२ साली कमलाकर धनवडे यांनी घेतली होती त्यांनी मिळालेली जागा त्याच वेळी विकली मात्र महसुल सातबारावर व १४३६ नंबरच्या फेरफार वर धनवडे यांचे नांव तसेच राहीले याचा आधार घेऊन धनवडे यांचे वारसांनी सातबारा पत्रकी नांव नोंद केले व जागेचा ताबा मागितला.
फेरफार रद्द करण्याची मागणी
यादरम्यान पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे-जाधव यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करुन सि. स. नंबर६३५ जागेचा जुना सर्व्हे नंबर ८/अ/१ याची पोकळ नोंद राहीलेला फेरफार रद्द करण्याची मागणी केली. त्या बाबत सुनावणी घेऊन निर्णय देत असल्याचे पत्र उपविभागीय अधिकारी यांनी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजीव सोरटे यांना दिल्याने मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांच्या हस्ते उपोषण समाप्त करण्यात आले.