मुंबई : मुंबईत रविवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रेल्वेरुळांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकलसेवा ठप्प झाली असून, अनेक एक्स्प्रेसही अडकल्या आहेत. दरम्यान अधिवेशनासाठी मुंबईत येणाऱ्या आमदारांनाही पावसाचा फटका बसला आहे. लांब पल्ल्याची एक्स्प्रेस बंद पडल्याने अनेक आमदार ट्रेनमध्येच अडकले आहेत.
आमदार रेल्वे रुळांवरून पायी निघाले
विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाज सत्रात सहभागी होण्यासाठी हे आमदार निघाले असून, अपेक्षित स्थळी पोहोचण्यास होणारा उशीर पाहता त्यांनी अखेर रेल्वे रुळावरूनच चालण्याचा पर्याय निवडल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये मंत्री अनिल पाटील, आमदार अमोल मिटकरी, संजय गायकवाड आणि इतर अनेक आमदारांचा समावेश असल्याचं पाहायला मिळालं.
तसेच सोलापूर वरून मुंबईला येणारी सिध्देश्वर एक्सप्रेस गाडी कुर्ला येथे अडकली आहे. सुभाष देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि औसा मतदारसंघ आमदार अभिमन्यू पवार हे देखील ट्रेनमध्ये अडकले आहेत. पावसाचा फटका बसल्यानंतर ट्रेन अडकल्याने प्रवाशांनी एक्स्प्रेस सोडून पायी चालणं पसंत केलं आहे. अनेक आमदारांनीही हाच मार्ग निवडल्याचं दिसून आलं.