नागपूर : वस्तीत वर्चस्व निर्माण करण्यासाठी एका गुंडाने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने परिसरातच राहणाऱ्या बांधकाम मिस्त्रीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या (Murder in Nagpur) केली. ही थरारक घटना बेलतरोडी ठाण्यांतर्गत महाकालीनगर झोपडपट्टीत मंगळवारी रात्री घडली. सुधाराम बाहेश्वर (वय 44 रा. महाकालीनगर, अशोकनगरी) असे मृताचे नाव आहे. अमन नागेश चव्हाण (वय 22) व एक 14 वर्षीय अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी खुनाचा (Murder) गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास हातात शस्त्र घेऊन त्याने हैदोस घातला होता. यादरम्यान त्याने तीन ते चार लोकांना मारहाण सुद्धा केली. त्यामुळे वस्तीत दहशतीचे वातावरण होते. मृतक सुधाराम हे बांधकाम मिस्त्रीचे काम करतात. त्यांना पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे. मंगळवारी ते रात्रीला कामावरुन घरी आले. दरम्यान, आरोपींनी काहीही कारण नसताना त्यांच्याशी वाद घातला आणि काही कळण्याआधीच अचानक धारदार शस्त्राने वार करुन त्यांची निर्घृण हत्या केली. त्यामुळे संपूर्ण वस्तीत दहशत निर्माण झाली.
प्रत्येकाने आपापली दारे व खिडक्या बंद केल्या. यावेळी सुधारामला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठले. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अमनविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.