Pimpri News : एकदाही कर न भरलेले शहरात तब्बल 34 हजार 22 मालमत्ताधारक; महापालिका 'अॅक्शन मोड'वर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना देखील काही मालमत्ताधारकांनी एकदाही कर भरलेला नाही. शहरात ३४ हजार २२ अशा मालमत्ताधारकांची नोंद असून, महापालिकेने त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. कर भरणा न केल्यास जप्तीची कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुमारे ७ लाख ३१ हजार मिळकती नोंदविल्या असून, त्यापैकी ४ लाख २६ हजार मालमत्तांधारकांनी चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर भरला आहे. कर संकलन विभागाने पहिल्या तिमाहीत विक्रमी ५२२ कोटी रुपयांचा कर संकलन केला असून, संपूर्ण वर्षासाठी १३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १८ विभागीय कार्यालयांमार्फत काम सुरू आहे.
थकबाकीदारांविरोधात नोटीस, जप्तीची तयारी
कर संकलन विभागाच्या माहितीनुसार, १ लाख १२ हजार ८०९ निवासी मालमत्तांधारकांकडे सुमारे ३१० कोटी रुपये थकबाकी आहे. यामध्ये अनेक मालमत्तांधारक ५ ते १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून कर भरत नाहीत. त्यामुळे अशा थकबाकीदारांवर महापालिकेने जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई हाती घेतली आहे. त्यामध्ये कार, टीव्ही, फ्रिज यांसारख्या घरगुती वस्तूंचाही समावेश असेल.
ऑनलाईन कर भरणाऱ्यांना सवलतीचा लाभ
महापालिकेने जाहीर केले आहे की, १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने भरल्यास ४ टक्के सवलत मिळणार आहे. नागरिकांनी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी मालमत्ता बिलाशी लिंक करून घ्यावा, जेणेकरून सर्व नोटिफिकेशन आणि सेवा डिजिटल स्वरूपात सहज मिळू शकतील.
कर मोहिमेस मोठा प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अनेकांनी अजूनही एकदाही मालमत्ता कर भरलेला नाही. त्यामुळे अशा थकबाकीदारांवर आता कठोर कारवाई अटळ आहे. जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
चालू आर्थिक वर्षासाठी १३०० कोटींचे उद्दिष्ट
चालू आर्थिक वर्षासाठी १३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरावा, यासाठी ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. मोबाईल व ई-मेलद्वारे सूचना मिळण्यासाठी नागरिकांनी त्यांची माहिती अपडेट करावी.
– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर संकलन विभाग