
पन्हाळा : पन्हाळा व परिसरात दमदार पाऊस सुरु आहे. याच पावसाने पन्हाळ्याच्या पुर्वेस असणाऱ्या आपटी पैकी सोमवार पेठ येथील २६५ लोकसंखेची धारवाडी येथे दुपारी पासून भुस्खलन होत असल्याने परिसरातील शेतकरी धास्तावले होते.प्रशासनाने दक्षता घेत पंचेचाळीस घरातील माणसांना जवळ असणाऱ्या नातेवाईक व नावली येथील शाळेत राहण्याची सोय केली आहे.
गेले आठवडाभर सलग पडणाऱ्या पावसामुळे पन्हाळगड व मसाई पठार भोवतालच्या डोंगरउतारावरील भूस्खलन होणाऱ्या गाव, वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकत होता अशातच मंगळवारी दुपारी धारवाडी डोंगरांचे भुस्खलन सुरू झाले आणी प्रशासन सतर्क झाले तर परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना आपला प्रपंच घेऊन बाहेर पडावे लागले.
तीन वर्षांपूर्वी पन्हाळगडाच्या पायथ्याला भूस्खलन होऊन रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. याच डोंगरमालेशी संलग्न जोतिबा डोंगर, मसाई पठार म्हाळुंगे, वेखंडवाडी, बादेवाडी, बोंगेवाडी व मराठवाडी गावांचीही हीच स्थिती झाली. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर, मंगळवारपेठ, आपटी, बुधवारपेठ, रविवारपेठ गावांना नेहमीच भूस्खलनाचा धोका आहे. पन्हाळा, मसाई पठार व सभोवताली प्रचंड प्रमाणात पडणारा पाऊस, बेसुमार वृक्षतोड तसेच जमिनीचे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सपाटीकरणामुळे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील जमीन खचण्याचे प्रमाण वाढले आहे.. सध्या या परिसरात मुसळधार पाऊस असून नुकत्याच झालेल्या रायगड जिल्ह्यातील भूस्खलन दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. तहसीलदार माधवी शिंदे जाधव, तलाठी सुनीता गोरे यांनी वाडी वरील सर्वांना सतर्कतेच्या सूचना दिल्या यावेळी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.