'कॉसमॉस' फुलांच्या सौंदर्याच्या आड पर्यावरणासाठी लपलाय 'हा' गंभीर धोका; आक्रमक वनस्पतीमुळे थेट...
अनेक ठिकाणी सध्या पिवळ्या कॉसमॉस फुलांचा बहर
या फुलांमुळे जैवविविधतेवर आणि पशुधनाच्या खाद्यावर थेट परिणाम
कॉसमॉस ही मूळ मेक्सिकोतील वनस्पती
सुनयना सोनवणे/पुणे: अनेक ठिकाणी सध्या पिवळ्या कॉसमॉस फुलांचा बहर दिसत आहे. नागरिक या फुलांपुढे फोटो काढून समाज माध्यमांवर शेअर करत असले तरी, या सौंदर्याच्या आड पर्यावरणासाठी एक गंभीर धोका दडलेला आहे. ही परदेशी, आक्रमक वनस्पती स्थानिक जैवविविधतेवर आणि पशुधनाच्या खाद्यावर थेट परिणाम करत आहे.
कॉसमॉस ही मूळ मेक्सिकोतील वनस्पती असून ती सूर्यफूल कुटुंबातील (ॲस्टेरेसी) सदस्य आहे. या झाडांना मोठ्या प्रमाणावर फुले येतात आणि त्यांची बियाणे वाऱ्याद्वारे किंवा इतर माध्यमांतून सहजपणे पसरतात. त्यामुळे ती झपाट्याने वाढते आणि स्थानिक गवत, झुडपे, तसेच इतर फुलझाडांना स्पर्धा करत त्यांचे अस्तित्व कमी करते. परिणामी, गुरेढोरे व वन्य शाकाहारी प्राणी यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्थानिक खाद्य वनस्पतींची कमतरता निर्माण होते.
पूर्वी ही वनस्पती केवळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूने आढळत होती; मात्र आता ती तळजाई, कात्रज घाट, पाषाण, एनडीए परिसर आणि शहरातील विविध हिरव्या पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. स्थानिक गवत कमी होत असल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर ‘नवराष्ट्र’शी बोलताना म्हणाले की, कॉसमॉससारख्या आक्रमक तणांमुळे आपल्या हिरव्या क्षेत्रांचा ऱ्हास होत आहे आणि परिसंस्थेचा समतोल बिघडतो आहे. लोकसहभागाशिवाय या वनस्पतींचे उच्चाटन शक्य नाही. फुले येण्यापूर्वीच या झाडांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे.
Diwali 2025: सजावटीतून सजगतेकडे; दिवाळी भेटवस्तूंमध्ये बदलता ट्रेंड
डॉ. पुणेकर यांनी ‘जैविक आक्रमणाविरुद्ध चळवळ (माबी- एमएबीआय– मुव्हमेंट अगेन्स बायोलॉजिकल इन्वेंशन) या सार्वजनिक उपक्रमाची स्थापना केली आहे. ही चळवळ भारतातील पहिली हरित लोकचळवळ मानली जाते, ज्याचा उद्देश इन्व्हेसिव्ह एलियन स्पेसीज म्हणजेच परदेशी आक्रमक प्रजातींच्या नकारात्मक परिणामांना तोंड देणे आहे.
माबी चळवळ पर्यावरणवादी, शासकीय अधिकारी, शेतकरी, संशोधक आणि शैक्षणिक संस्थांना एकत्र आणून स्थानिक जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी कार्यरत आहे. या मोहिमेद्वारे कॉसमॉससह अनेक आक्रमक वनस्पतींची ओळख, त्यांच्या प्रसारावर नियंत्रण आणि इन्व्हेन्सिव्ह एलियन स्पेसीज (आयएएस) त्यांचे भौतिक उच्चाटन यासाठी लोकसहभागावर भर दिला जातो. तसेच, संदर्भातील संशोधन, माहिती आणि धोरणात्मक अंतर कमी करण्याचेही कार्य माबी करत आहे.
कॉसमॉसचे सौंदर्य लोकांना आकर्षित करते, परंतु ती एक आक्रमक तण आहे. मधमाश्या, फुलपाखरे आणि बीटल्स या फुलांकडे आकर्षित होतात, ज्यामुळे स्थानिक फुलझाडांच्या परागीकरणावर परिणाम होतो. दीर्घकाळात यामुळे संपूर्ण जैवसाखळी धोक्यात येऊ शकते. शासकीय आणि खाजगी संस्थांनी एकत्र येऊन, तसेच ग्रामपातळीवरील जैवविविधता समित्यांनी यामध्ये सहभाग घेतल्यास या परकीय वनस्पतींचे समूळ उच्चाटन शक्य होईल, असेही सचिन पुणेकर म्हणाले.
कॉसमॉस फुले दिसायला सुंदर असली तरी ती स्थानिक पर्यावरणासाठी आणि जैवविविधतेसाठी घातक आहेत. सौंदर्याच्या आड दडलेला हा धोका ओळखून आता ‘कॉसमॉस मुक्त शहर’ करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.