Ichalkaranji News: रिक्षांचालकांची मनमानी भाढेवाढ; पुनःप्रमाणीकरण न केल्यास...
कोल्हापूर: जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्राकरिता कोल्हापूर व इचलकरंजी ऑटोरिक्षांसाठी रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीसाठी किमान भाडेदराच्या २५ टक्के अतिरिक्त भाडेदर अनुज्ञेय राहील. महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागाकरिता रात्री ११ ते सकाळी ५ या कालावधीसाठी किमान भाडेदराच्या ४० टक्के अतिरिक्त भाडेदर आकारणी केली जाईल. दि. १ मार्च पासून नवे भाडे दर लागू होणार असल्याने ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणिकरण करण्यासाठी दि. १ मार्च पासून ३१ मे पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
दरम्यान, दि. १ मार्च पासून ऑटोरिक्षांकरिता सुधारित भाडेदर लागू होत असल्याने, जे ऑटोरिक्षाधारक दि. १ मार्चपासून मीटर पुन:प्रमाणीकरण करुन घेतील त्याच ऑटोरिक्षाधारकांसाठी भाडेसुधारणा लागू राहील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कोल्हापूर व इचलकरंजी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर समितीच्या शिफारसीच्या अनुषंगाने भाडे सुधारणेबाबत विविध रिक्षा संघटनांना वेळोवेळी अवगत करण्यात आले होते. याबाबत त्यांच्या शिफारसी भाडेसुधारणा करताना विचारात घेण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर समितीच्या शिफारसीस अनुसरुन बैठकीमध्ये जिल्ह्यातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता ऑटोरिक्षा भाडेसुधारणेबाबत निर्णय घेण्यात आला.
अशी असेल भाडे वाढ
किमान देय भाडे – २२ रुपये
सुधारित भाडेदर २५ रुपये,
त्यापुढील प्रत्येक किमीसाठी देय भाडे – १८ रुपयावरून सुधारित भाडेदर २३ रुपये
पुनःप्रमाणीकरण न केल्यास कारवाई
जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुनःप्रमाणीकरण करुन घेणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. विहित मुदतीत मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी १ दिवस परवाना निलंबन, मात्र किमान ७ दिवस, तर कमाल निलंबन कालावधी ४० दिवस राहील. मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रुपये. मात्र किमान ५०० रुपये. तर कमाल तडजोड शुल्क २ हजार रुपयांपेक्षा अधिक असणार नाही.
इचलकरंजीत मिटर पद्धतच नाही
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात रिक्षा चालक मीटरने भाड्याची आकरणी करत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक फटका सहन करावा लागतो. आरटीओच्या दुर्लक्षामुळे इचलकरंजीत रिक्षाचालकांची मनमानी सुरू आहे. याला आवर घालणे गरजेचे आहे.