बुलढाणा: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway Accident) मध्यरात्री बुलढाण्याजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सचा (Vidarbha Travels) भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटली आणि डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली. या बसमध्ये झोपेतच 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच एक होती 25 वर्षीय युवती अवंती पोहणीकर.(Avanti Pohanikar) अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
अवंती पोहणीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठी ती शुक्रवारी सायंकाळी खासगी ट्रॅव्हल्सने निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या आईला धक्का बसला.
अपघाताची माहिती मिळाली तेव्हा आपली मुलगी ठीक असेल ना, तिला काही झालं तर नसेल या भीतीने आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. मला अवंतीजवळ घेऊन चला, असं म्हणत तिच्या आईने टाहो फोडला. त्यावेळी तिला अवंती अपघातात वारली की जिवंत आहे हे माहिती नव्हतं.
अवंतीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं तर तिच्या वडिलांचं ती लहान असतानाच निधन झालं. त्यानंतर तिची आई प्रणिता यांनीच अवंती आणि तिची बहीण मोनू यांचा सांभाळ केला. प्रणिता या मेघे विद्यापिठात कार्यरत आहेत. आईची प्रकृती बरी नसते म्हणून अवंती परदेशी गेली नाही. पण तिने एक मॉडेल म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली. अवंतीला मेकअप आर्टिस्ट म्हणून करिअर करायचं होतं. मात्र तिनं आणि तिच्या आईने पाहिलेलं स्वप्न अपूर्णच राहिलं. ती नोकरीच्या निमित्तानेच पुण्याला जात होती. पण वाटेत काळाने तिच्यावर घाला घातला.
बसचालकावर गुन्हा दाखल
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी आरोपी शेख दानीश याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या चालकाला अटक देखील करण्यात आली आहे. शेख दानीश शेख इसराईल हा विदर्भ ट्रॅव्हल्सचा चालक होता. त्याच्यावर 279, 304, 337 व 427 आयपीसीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोटार वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.