
बी. एड. प्रवेशाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ९२ टक्क्यांहून अधिक प्रवेश
पुणे/सोनाजी गाढवे : राज्यातील शिक्षणशास्त्र (बी. एड.) पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण ३६ हजार ९९८ जागांपैकी तब्बल ३३ हजार ८७७ जागांवर प्रवेश निश्चित झाला असून, ९२.३१ टक्के प्रवेश दर नोंदविण्यात आला आहे. राज्यातील ४८३ महाविद्यालयांमध्ये बी. एड. अभ्यासक्रम चालवला जातो. या महाविद्यालयांमध्ये शासकीय, शासकीय अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विद्यापीठाअंतर्गत संस्था यांचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष तर्फे जून ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडली.
सीईटी कक्षाच्या माहितीनुसार, एकूण ३६ हजार ९९८ जागांपैकी ३४ हजार १७० जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे उपलब्ध होत्या. यापैकी ३२ हजार ६४३ जागांवर म्हणजेच ९५.५३ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तीन केंद्रीय फेऱ्यांनंतर संस्थात्मक फेरी घेण्यात आली असून, चार फेऱ्यांमधून ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थिनींचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात बी. एड. महाविद्यालयांची संख्या वाढल्यामुळे उपलब्ध जागाही वाढल्या आहेत, तरीही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढतच आहे, हे विशेष आहे.
सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढत आहे. बी. एड. अभ्यासक्रम हा स्थिर आणि प्रतिष्ठित व्यावसायिक पर्याय म्हणून विद्यार्थ्यांकडून अधिक पसंती मिळवत आहे. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक रीतीने पूर्ण झाली आहे. या वाढत्या प्रतिसादामुळे राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षक घडविण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
प्रवेशाची आकडेवारी
| वर्ष | एकूण जागा | निश्चित झालेले प्रवेश | प्रवेशाची टक्केवारी |
|---|---|---|---|
| २०२३- २४ | ३४,२४० | ३०, ०३८ | ८७.७३ |
| २०२४- २५ | ३६,४३३ | ३३,००० | ९०.५७ |
| २०२५- २६ | ३६,६८९ | ३३,८७७ | ९२.३१ |