अमरावती – प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये भाजपविरोधात उमेदवार उभा केला आहे. महायुतीमध्ये सामील असून देखील अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार संघटनेने दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. तसेच प्रहार संघटनेने हे बंड फक्त अमरावतीमध्ये केले असून इतर ठिकाणी कोठेही उमेदवार उभे केलेले नाही. त्यामुळे बच्चू कडू हे महायुतीमध्ये सामील आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर स्वतः बच्चू कडूंनी उत्तर देत स्पष्टीकरण दिले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी महायुतीमध्ये ते सामील आहेत की नाही याबाबत स्पष्टीकरण दिले. बच्चू कडू म्हणाले, “अमरावतीत आम्ही महायुतीच्या विरोधात लढतो आहे. आम्ही एकप्रकारे बंड केलं आहे. त्यामुळे आता आम्हाला महायुतीत ठेवायचं की नाही, हा त्यांच्या नेत्यांचा प्रश्न आहे. ते जो निर्णय घेतली, आम्ही त्याचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. तसेच आमचं बंड हे केवळ अमरावतीपूरतं मर्यादित आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केलं.
नवनीत राणांना नेमका विरोध का?
पुढे बोलताना त्यांनी नवनीत राणा यांना नेमका विरोध का आहे? यासंदर्भातील प्रतिक्रिया दिली. “राणा दाम्पत्याला विरोध करण्यामागे दोन तीन कारणं आहेत. एक म्हणजे रवी राणा हे नेहमी मारण्याची भाषा करतात. धमक्या देतात. त्यांनी मलादेखील घरी येऊन मारण्याची धमकी दिली होती. अमरावती जिल्ह्याचं वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न सातत्याने रवी राणा यांच्याकडून केला जातो. याशिवाय नवनीत राणा या पाच वर्ष खासदार होत्या. मात्र, पाच वर्षात त्यांनी कोणतीही कामे केली नाहीत. या जिल्ह्याला खासदार आहे की नाही हेच जनतेला माहिती नव्हते. कारण त्या अमरावतीत कधी दिसल्या नाहीत. त्यामुळे अमरावतीच्या जनतेमध्ये त्यांच्या विरोध रोष होता आणि जनतेने त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याची मागणी केली होती”, असे ते म्हणाले.