पुणे : पुणेकर आणि लोकभावनेचा विचार करून केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी आकाशवाणीच्या (Akashvani) पुणे केंद्रावरुन प्रक्षेपण होणारे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chancrakant Patil) यांनी दिली.
अधिकारी नसल्याच्या कारणावरून पुणे केंद्रावरून सकाळी प्रसारित होणार्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातम्या 19 जूनपासून छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार होते. या विभागाद्वारे प्रसारित केली जाणारी विविध भारतीवरील ठळक बातमीपत्रे, पुणे वृत्तांत हे विशेष बातमीपत्र आणि वृत्ताधारित कार्यक्रम आता बंद होणार आहेत. सर्वाधिक श्रोते असलेल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याच्या हालचाली प्रसारभारतीकडून सुरू झाल्या होत्या.
या निर्णयामागे कारण देताना प्रसार भारतीने या विभागांचे प्रमुख म्हणून काम करण्यासाठी भारतीय माहिती सेवेतील पूर्णवेळ अधिकारी दीर्घकाळापासून उपलब्ध नसल्याने पुणे वृत्त विभागाची बातमीपत्रे औरंगाबादला सोपवण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले होते.
यामुळे पुणेकरांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. तसेच राजकीय पक्षांकडूनही या निर्णयावर टीका गेली जात होती. यामुळे पाटील यांनी केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून विनंती केली होती.
पुणेकर आणि लोकभावनेचा आदर करुन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली आहे, अशी माहिती पाटील यांनी कळविली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी केंद्राकडे करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी नमूद केले.