मुख्यमंत्र्यांचा दौरा अन् 'त्या' खड्ड्यांची डागडुजी
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी-ब्रह्मपुरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर गडचिरोली शहरापासून एक किमी अंतरावरील खरपुंडी वनविभागाच्या नाक्याजवळ मागील अनेक दिवसांपासून एका बाजूला भलामोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे याठिकाणी अनेकदा अपघात घडले. याबाबत ‘नवराष्ट्र’ने वृत्त प्रकाशित करून संबंधित विभागाचे लक्षही वेधले होते. मात्र, तरीही काही कार्यवाही केली गेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली येथे येत असल्याचे कळताच संबंधित विभागाने आरमोरी मार्गावरील या खड्ड्यांची रात्रीतूनच किरकोळ दुरुस्ती केली. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरु आहेत.
गडचिरोली-आरमोरी-ब्रह्मपुरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. गडचिरोली शहरापासून एक किमी अंतरावर वनविभागाच्या नाक्याजवळ मागील अनेक दिवसांपासून एका बाजूने भलामोठा खड्डा पडला होता. त्यामुळे याठिकाणी अनेकदा अपघात घडले.
विशेष म्हणजे, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी काही महिन्यांपूर्वी दुचाकीवर फिरून शहरातून जाणाऱ्या चारही राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी करून सदर खड्डे तत्काळ बुजविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. याबाबीला जवळपास 5-6 महिन्यांचा कालावधी लोटला होता. मात्र, आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्याजवळील सदर खड्ड्याची डागडुजी करण्यात आली नव्हती.
याठिकाणी गडचिरोली पोलिसांतर्फे अनेकदा बॅरिकेट्स लावून वाहनांची तपासणी करण्यात येते. या खड्यामुळे अपघात होऊ नये म्हणून एक बॅरिकेट्स त्या खड्ड्याजवळ लावण्यात आले होते. हे सगळे चित्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसूनही खड्डा बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
मुख्यमंत्री दौऱ्याची पूर्वसूचना मिळताच आपल्या विभागाची कानउघाडणी होईल, या कारणाने सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर खड्ड्यांमध्ये रात्रीतूनच सिमेंट काँक्रीटचा तात्पुरता मुलामा लावून किरकोळ स्वरुपाची डागडुजी केली. मात्र, आजपर्यंत सामान्य नागरिक मागणी करत असताना या विभागाला जाग आली नाही, याचे आश्चर्य वाटते.