शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला जनताच जागा दाखवेल; बापूसाहेब पठारे यांचा टिंगरेंवर हल्लाबोल
पुणे : पोर्शे प्रकरणावरून बदनामी करू नये यासाठी वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना नोटीस पाठवली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरीच्या सभेत याचा खुलासा केला होता. चक्क सुनील टिंगरे यांनी शरद पवारांनाचं नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. ही बाब समोर आल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांच्यावर चहुबाजूने टीका होत होती. त्यानंतर आता वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला आता जनताच जागा दाखवेल असे बापू पठारे म्हणाले.
विश्रांतवाडी येथील भाजपच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बापू पठारे हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना बापू पठारे म्हणाले, पात्रता नसतानाही त्यांनी शरद पवारांना नोटीस पाठवली. आता वडगाव शेरीतील नागरिकच त्यांना त्यांची पात्रता दाखवून देतील. शरद पवार ईडीच्या नोटिसीला देखील घाबरले नाहीत. त्यामुळे एखादा चिल्लर आमदार जर त्यांना नोटीस पाठवत असेल तर जनताच त्यांना जागा दाखवेल.
दरम्यान आमदार सुनील टिंगरे त्यांच्या दादागिरीला परिसरातील नागरिक घाबरले आहेत. कुणीही समोर येऊन बोलण्यास तयार नाही. त्यांच्या या दादागिरीला कंटाळल्याने संपूर्ण टिंगरे कंपनी आणि गाव माझ्यासोबत आहे. रेखा टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात केलाय आणि त्या आता त्यांच्या भागातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळवून देतील. आमदार टिंगरेंच्याच भागातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याचं निकालाच्या दिवशी कळेल, असेही बापूसाहेब पठारे म्हणाले.
हे सुद्धा वाचा : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दोन पोलिसांसह चौघे जखमी
पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण देशभरामध्ये चर्चिले गेले. अल्पवयीन मुलाने केलेल्या या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला दिलेल्या निबंध लिहिण्याच्या शिक्षेमुळे सर्वांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरुन आता सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “पोर्श प्रकरणात जर माझी बदनामी केली तर मी कोर्टात खेचेन, या आशयाची नोटीस वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पाठवली”, असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगावशेरी मतदार संघाचे उमेदवार बापू पठारे यांच्यासाठी सभा घेतली. या सभेत त्या बोलत होत्या. यावरुन आता टींगरे यांच्यावर टीका केली जात आहे.