वेळ पडली तर मी स्वतःला विकेन, पण 'छत्रपती' बंद पडू देणार नाही; पृथ्वीराज जाचक आक्रमक
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या युनिट नंबर १ चा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक निलेश टिळेकर व त्यांच्या पत्नी रश्मी टिळेकर यांच्या हस्ते तसेच युनिट नंबर २ चा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक संतोष मासाळ व त्यांच्या पत्नी वैशाली मासाळ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आयोजित समारंभात जाचक बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर, यांच्यासह इतर आजी-माजी संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
Pune Crime: पुण्यात देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; तरुणींना हॉटेलमध्ये डांबून ठेवून…
यावेळी अध्यक्ष जाचक म्हणाले, पुणे जिल्ह्यात पहिला बॉयलर अग्निप्रतीपण समारंभ छत्रपती कारखान्याचा होत आहे, याचा आपणास आनंद आहे. ऊस तोडणी ऍडव्हान्स देणारा छत्रपती पहिला कारखाना आहे. या हंगामात साडेबारा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, सलग आठ वर्ष बारा लाखहून अधिक टन गाळप झाल्यानंतर कारखाना पूर्णपणे अडचणीतून बाहेर येईल. यावर्षीच्या ऊस गळीत हंगामासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार पार्थ पवार यांच्यासह मुख्यमंत्री, सहकार मंत्री यांनी सहकार्य केले आहे.
” छत्रपती” चा हंगाम १ ऑक्टोबरला जरी सुरू झाला तरी, सर्व यंत्रणा कारखान्याची सज्ज आहे. गेली दहा वर्षात प्रति टन ५०० रुपयाप्रमाणे दर कमी बसल्याचे गणित ग्राह्य धरले तर, तब्बल साडेतीनशे कोटी रुपये तोटा झाला आहे. अडचणीतील छत्रपती कारखाना बाहेर काढण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून सह वीज निर्मिती प्रकल्पाला विरोध करत होतो, कारण हा प्रकल्प साखर कारखान्याचा फायद्याचा नाही. ज्या कारखान्यांनी हा प्रकल्प राबवला ते कारखाने तोट्यातच गेले आहेत, गुजरात मध्ये एकही कारखाना सहवीज निर्मिती प्रकल्प उभारत नाही.
सध्या साखरेचे दर वाढत आहेत, या हंगामात देखील साखरेचा दर ₹50 kg च्या आत मध्ये येणार नाही. छत्रपतीला निधी उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांच्या मुंबई दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. सध्या अडचणी असल्या तरी पैसे अभावी छत्रपती बंद राहणार नाही, वेळप्रसंगी हा पृथ्वीराज जाचक स्वतःला विकेल, आता छत्रपती बंद पडू देणार नाही. ऊस दराच्या बाबतीतही छत्रपती मागे राहणार नाही. मात्र सभासदांनी आपला ऊस छत्रपतीलाच गाळपास द्यावा, असे आवाहन जाचक यांनी यावेळी केले.
यावेळी कारखान्याचे संचालक रामचंद्र निंबाळकर यांच्यासह जयराम रायते, ॲड संभाजीराव काटे, बाळासाहेब शिंदे, शंकरराव रुपनवर आदींनी आपल्या भाषणात विविध सूचना मांडल्या. प्रास्ताविकात या ऊस गळीत हंगामातील आढावा कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी घेतला. सूत्रसंचालन कामगार नेते युवराज रणवरे यांनी केले.आभार संचालक तानाजी शिंदे यांनी मानले. यावेळी संचालक अशोक पाटील,कैलास गावडे, सतीश देवकाते, ॲड शरद जामदार, पृथ्वीराज घोलप, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर आदींसह इतर मान्यवर व सभासद उपस्थित होते.






